नेपाळसाठी सीमा प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:53 AM2020-06-01T04:53:00+5:302020-06-01T04:53:12+5:30
प्रा. जायसवाल : भारतातही ‘राष्ट्रवादी’ सरकार
टेकचंद सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजकारण कोण करीत नाही? सर्वच देशांमधील सत्ताधारी करतात. हा मुद्दा आधीपासून होता; पण नेपाळने आताच उकरून काढला हा भारतीय प्रसारमाध्यमांचा आक्षेप योग्य नसल्याचे काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठातील परराष्ट्र संबंध व डिप्लोमसी विभागातील डॉ. प्रमोद जायसवाल यांनी सांगितले.
डॉ. जायसवाल नेपाल इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल को आॅपरेशन अॅण्ड एंगेजमेंटमध्ये रिसर्चचे डायरेक्टर असून, त्यांनी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन व अध्यापनही केले आहे. २००६ ते २०१४ दरम्यान ते दिल्लीत होते. ८ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख मार्गाचे उद्घाटन केल्यावरच नेपाळमधील सामान्य लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. स्थानिकांच्या दबावामुळेच सरकारने भारताला विरोध दर्शवला. भारतदेखील शेजारी देशांशी सीमाप्रश्नावरून संघर्ष करतो आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ नेपाळला वाटली. हा मुद्दा आताच नेपाळने उकरून काढलेला नाही. परराष्ट्र संबंधांचा अभ्यास सुरू केल्यापासून मी या प्रश्नाविषयी ऐकले आहे, असेही ते म्हणाले.
मुद्दा संपला नाही
पंतप्रधान के.पी. ओली यांनी स्वत:ची राष्ट्रवादी प्रतिमा बळकट करण्यासाठी व सरकार स्थिर ठेवण्यासाठी लिपुलेख वाद उकरून काढल्याच्या आरोपावर ‘भारतातही राष्ट्रवादी विचारांचे सरकार आहे’, असा प्रतिप्रश्न केला. गेल्या ७० वर्षांत हा मुद्दा संपला नाही. नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक मुद्दे चर्चा करून निकाली काढले. नेपाळने नेहमी संयमी भूमिका घेतली. भारताला सहकार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.