भाजपाच्या हेरगिरीचे अमेरिकेने ‘एनएसए’ला दिले होते अधिकार
By admin | Published: July 2, 2014 03:51 AM2014-07-02T03:51:42+5:302014-07-02T03:51:42+5:30
एका अमेरिकी न्यायालयाने २०१० मध्ये भाजपासह जगभरातील पाच राजकीय पक्षांची हेरगिरी करण्याचे अधिकार देशाच्या प्रमुख गुप्तहेर संघटनेस दिले होते.
वॉशिंग्टन : एका अमेरिकी न्यायालयाने २०१० मध्ये भाजपासह जगभरातील पाच राजकीय पक्षांची हेरगिरी करण्याचे अधिकार देशाच्या प्रमुख गुप्तहेर संघटनेस दिले होते. एका गोपनीय दस्तावेजातून ही माहिती उघड झाली आहे.
अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने (एनएसए) भाजपाखेरीज मुस्लिम ब्रदरहूड (इजिप्त), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पाकिस्तान), अमाल (लेबनॉन), बोलीव्हारियन कॉन्टिनेन्टल कॉर्डीनेटर (व्हेनेझुएला) आदी राजकीय संघटनांच्या हेरगिरीची परवानगी मागितली होेती, असे या दस्तावेजात म्हटले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने सोमवारी हा दस्तावेज प्रसिद्ध केला. परदेशी गुप्तचर निगराणी न्यायालयाने २०१० मध्ये १९३ विदेशी सरकारे तसेच परदेशी पक्ष, संघटना आणि इतर प्रतिष्ठानांच्या हेरगिरीस मुभा दिली होती. या यादीत भारताचा समावेश होता.
विदेशी गुप्तचर माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने एनएसए या पक्ष आणि संघटनांची हेरगिरी करू शकते, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. एनएसएचा माजी ठेकेदार एडवर्ड स्नोडेन याने हा दस्तावेज वॉशिंग्टन पोस्टला पुरविला आहे. अमेरिका जगभरातील नागरिकांची त्याचप्रमाणे राष्ट्रप्रमुखांची हेरगिरी करीत असल्याचे स्नोडेननेच उघडकीस आणले होते. यावरून अमेरिकेविरुद्ध जगभर संताप निर्माण झाला होता. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, ब्रिटन, कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार देश वगळता कोणतेही विदेशी सरकार राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या कक्षेबाहेर नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे.
भारत आणि भाजपावर निगराणी ठेवण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर न देता एनएसएच्या प्रवक्त्या वॅनी व्हिनेस म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रीय गुप्तहेर संघटनेचे संचालक आणि इतर विभागांच्या गुप्तचर गरजांनुसार एनएसए विदेशी गुप्तचर माहिती गोळा करते. (वृत्तसंस्था)