अविभाजित भारताच्या 'या' क्षेत्राशी संबंधित आहेत ऋषी सुनक; पहिल्यांदा केनिया, नंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले कुटुंब!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 06:14 AM2022-10-25T06:14:04+5:302022-10-25T06:14:30+5:30
Rishi Sunak Family History : बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशी बातमी आली आहे, ज्याची अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत होते. आता पहिल्यांदाच भारतीय वंशाचा ब्रिटनचा नवा पंतप्रधान होणार आहे. बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांना कंझर्वेटिव्ह पक्षाच्या सुमारे 180 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. आता ते लवकरच ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील. दरम्यान, ऋषी सुनक यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेऊया...
ऋषी सुनक यांच्या कुटुंबाविषयी फारच कमी माहिती सार्वजनिक झाली असली तरी. पण सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, ऋषी सुनक हे मूळचे अविभाजित पंजाबमधील गुजरांवाला जिल्ह्यातील आहेत. आता हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म गुजरांवाला जिल्ह्यात झाला. ते पंजाबी खत्री कुटुंबातील आहेत. त्यावेळी देशावर इंग्रजांचे राज्य होते. ऋषी सुनक यांचे आजोबा रामदास सुनक हे 1935 मध्ये गुजरांवाला सोडून केनियाची राजधानी नैरोबी येथे क्लार्कच्या नोकरीसाठी आपल्या कुटुंबासह शिफ्ट झाले होते. तिथेच ऋषी सुनक यांचे वडील यशवीर यांचा जन्म झाला. तर त्यांची आई उषा भारतातून टांझानियामध्ये स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील आहे.
आधी केनिया, नंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले कुटुंब
केनियाची राजधानी नैरोबी येथे ऋषी सुनक यांचे वडील यशवीर यांचा जन्म झाला. तर त्यांची आई उषा भारतातून टांझानियामध्ये स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील आहे.यानंतर त्यांचे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले, जेथे 12 मे 1980 रोजी साउथॅम्प्टन येथे ऋषी सुनक यांचा जन्म झाला. ऋषी सुनक यांचे वडील यशवीर सुनक हे सेवानिवृत्त डॉक्टर आहेत. तर आई उषा सुनक या फार्मासिस्ट आहेत. ऋषी सुनक हे तीन बहिणी आणि भावांमध्ये सर्वात मोठे आहेत. त्यांनी ब्रिटनच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. यासोबतच त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्डमधून एमबीएची पदवी घेतली आहे.
नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत लग्न
ऋषी सुनक यांनी इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनीही यासाठी संमती दिली होती. ऋषी सुनक आणि अक्षता यांना दोन मुली असून त्यांची नावे कृष्णा आणि अनुष्का आहेत. राजकारणात आल्यानंतर ते ब्रिटनच्या तेरेसा मे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री करण्यात आले आणि ते ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत.