Janmashtami: ऋषी सुनक यांनी जन्माष्टमीनिमित्त सपत्निक पूजा करतानाचे शेअर केले फोटो, सोशल मीडियावर वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:58 PM2022-08-19T14:58:53+5:302022-08-19T15:02:29+5:30
Janmashtami: जन्माष्टमीच्यानिमित्ताने ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार भारतीय वंशाचे Rishi Sunak यांनी आपली पत्नी अक्षता यांच्यासह इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. त्यांनी मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केला.
लंडन - आज भारतामध्ये जन्माष्टमीचा सण उत्साहाने साजरा केला जात आहे. जन्माष्टमीच्यानिमित्ताने ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आपली पत्नी अक्षता यांच्यासह इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. त्यांनी मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केला. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, आज मी माझी पत्नी अक्षता यांच्यासह जन्माष्टमी साजरी करण्यासाठी गेलो होतो. हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे.
ब्रिटनमध्ये पंतप्रधानाच्या निवडीसाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे. त्यादरम्यान, ऋषी सुनक यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. एका वर्गाने त्यांचं मंदिरात जाणं ही सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या वर्गाने त्यांच्या मंदिरातील दर्शनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
Today I visited the Bhaktivedanta Manor temple with my wife Akshata to celebrate Janmashtami, in advance of the popular Hindu festival celebrating Lord Krishna’s birthday. pic.twitter.com/WL3FQVk0oU
— Rishi Sunak (@RishiSunak) August 18, 2022
भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी ऋषी सुनक यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्यांच्या वर्तनाच्या अगदी विपरित वर्तन ऋषी सुनक हे आपला धर्म आणि संस्कृतीचा अभिमान बाळगून आहेत. मी त्यांना एक नेत्याच्या रूपामध्ये नाही तर एक व्यक्ती म्हणून श्रेय देतो. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे भारतामध्ये त्यांच्याकडे नॉन सेक्युलर म्हणून पाहिले जाईल.
रूपेन चौधरी नावाच्या एका सोशल मीडिया युझरने ट्विट करून लिहिले की, भारतीय वंशाचे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक हे जन्माष्टमीच्या पूजेसाठी त्यांच्या पत्नीसह इस्कॉन मंदिरात गेले. भारतातील सेक्युलर्स मंडळींना यामुळे काही तक्रार नसेल अशी अपेक्षा करतो.
दरम्यान, काही जणांनी ऋषी सूनक यांच्यावर टीकाही केली आहे. तसेच त्यामागे राजकारण असल्याचा दावा करत आहे. लिली शेरवू़ड नावाच्या एखा सोशल मीडिया युझरने ट्विट करून सांगितले की, मी कधी कुठल्या नेत्याला चर्च किंवा मंदिरातील प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले पाहिले नाही. सुनक यांना खासगी प्रार्थनेचे फोटो सार्वजनिक करावे लागलेत, ही बाब खूप संशयास्पद आहे. ते आपल्या पीआर टीमला सोबत घेऊन मंदिरात गेले होते का?