ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 11:16 AM2024-07-03T11:16:12+5:302024-07-03T11:20:21+5:30

या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे केअर स्टार्मर यांच्यात चुरशीची लढत आहे. 

Rishi Sunak vs Keir Starmer, Who Will Win The 2024 UK Elections? Who is richer Sunak assets Starmer Wealth  | ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 

ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहात आहेत. येथील जनता आता आपल्या आवडत्या पंतप्रधानाची निवड करणार आहे. यासाठी ब्रिटनमध्ये उद्या म्हणजेच ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे केयर स्टार्मर यांच्यात चुरशीची लढत आहे. 

आतापर्यंत आलेल्या सर्व ओपिनियन पोलमध्ये केयर स्टार्मर यांच्या लेबर पार्टीला आघाडी दिसून येत आहे. याचबरोबर, सर्वेक्षणानुसार, ऋषी सुनक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, ब्रिटनचे पुढील पंतप्रधान हे केयर स्टार्मर होऊ शकतात, असे मानले जात आहे. परंतु या सर्व गोष्टी उद्या मतदानानंतरच ठरतील. दरम्यान, या दोन नेत्यांपैकी सर्वात श्रीमंत कोण? याबद्दल जाणून घ्या.

ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माहितीनुसार, कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक हे लेबर पार्टीच्या केयर स्टार्मरपेक्षा श्रीमंत आहेत. ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती जवळपास ६५१ मिलियन पौंड आहे. त्यामागील कारण म्हणजे इन्फोसिसचे शेअर्स आहेत. अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये महत्त्वपूर्ण शेअर्स आहेत. 

गेल्या वर्षभरात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संडे टाइम्सच्या रिच लिस्टच्या अहवालानुसार अक्षता आणि ऋषी सुनक यांची संपत्ती ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्यापेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, या वर्षी त्यांच्या संपत्तीत १२० मिलियन पौंड इतकी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ५२९ मिलियन पौंडवरून ६५१ मिलियन पौंडपर्यंत वाढ झाली आहे.

याचबरोबर, लेबर पार्टीचे नेते केयर स्टार्मर यांची अंदाजे एकूण संपत्ती जवळपास ७.७ मिलियन पौंड आहे. त्यांची बहुतेक संपत्ती ही त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर कारकिर्दीतून येते. त्यांच्याकडे जवळपास १० पौंड मिलियन किमतीची जमीन आहे, जी त्यांनी १९९६ मध्ये वकील असताना खरेदी केली होती. केयर स्टार्मर यांची एकूण संपत्ती यूकेमधील सरासरी कुटुंबापेक्षा २५ पट जास्त असली तरी, ऋषी सुनक यांच्या तुलनेत ती कमीच आहे.

६५० जागांवर होणार मतदान 
दरम्यान, ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी एकूण ६५० जागांवर मतदान होणार आहे. सत्ता स्थापन करण्याचा आकडा ३२६ आहे, ज्या पार्टीला इतक्या जागा मिळतील, ती सरकार स्थापन करेल. ब्रिटनमध्ये अनेक दशकांपासून कंझर्व्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी यांच्यात लढत पाहायला मिळते. विशेष म्हणजे, याठिकाणी मतपेटीद्वारे मतदान केले जाते. यंदा ब्रिटनमध्ये ५ कोटी मतदार सहभागी होणार आहेत. निवडणुकीसाठी मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन रात्री ११ वाजेपर्यंत चालणार आहे.

ओपिनियन लेबर पार्टीला मोठी आघाडी
आतापर्यंतच्या पोलमधील रिपोर्टमध्ये ऋषी सुनक यांच्या पार्टीला धक्का बसला आहे, तर लेबर पार्टीला मोठी आघाडी मिळाली आहे. अनेक ओपिनियन पोलमध्ये लेबर पार्टी खूप पुढे आहे. मार्चमधील पोलमध्ये ऋषी सुनक यांना ३८ रेटिंग देण्यात आले होते, जे सर्वात वाईट रेटिंग होते. एप्रिलमध्ये, YouGov च्या पोलमध्ये असे दिसून आले की, कंझर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ १५५ जागा मिळतील. तर लेबर पार्टीला ४०३ जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ओपिनियन पोलनुसार, ऋषी सुनक यांच्या पार्टीला मोठा पराभव पत्करावा लागू शकतो, असा दावा सर्वेक्षणात करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण १८ हजार लोकांवर आधारित आहे.

Web Title: Rishi Sunak vs Keir Starmer, Who Will Win The 2024 UK Elections? Who is richer Sunak assets Starmer Wealth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.