ऋषी सुनक यांची दावेदारी मजबूत, १०० खासदारांचे समर्थन असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 05:35 AM2022-10-23T05:35:54+5:302022-10-23T06:51:32+5:30
निवडणूक लढविण्यासाठी ते कॅरेबियन सुट्टी आटोपून परतले आहेत. सुनक किंवा जॉन्सन यांच्यापैकी कोणीही अद्याप निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केलेला नाही.
लंडन : लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचाच दावा सर्वात मजबूत असल्याचे मानले जात आहे. सुनक यांनी आवश्यक १०० खासदारांचा पाठिंबा मिळविल्याचा दावा त्यांच्या पाठीराख्यांनी केला.
रिंगणात उतरू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत असून, यात माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भर पडली आहे. निवडणूक लढविण्यासाठी ते कॅरेबियन सुट्टी आटोपून परतले आहेत. सुनक किंवा जॉन्सन यांच्यापैकी कोणीही अद्याप निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केलेला नाही.
केवळ हाउस ऑफ कॉमन्सच्या नेत्या पेनी मॉर्डंट यांनीच त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ब्रिटनचा नवा पंतप्रधान निवडण्यासाठी पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहे.
दुसऱ्या क्रमांकावर जॉन्सन
सुनक यांना १०० खासदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. बोरिस जॉन्सन हे ऋषी सुनक यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्या बाजूने ४५ खासदार आहेत. त्याच वेळी पेनी मॉर्डंट तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना १९ खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉन्सन जर ही शर्यत जिंकून पंतप्रधान झाले, तर ते त्यांचे विलक्षण पुनरागमन असेल.