CoronaVirus News: O पॉझिटिव्हपेक्षा 'या' रक्त गटातील लोकांना कोरोनाचा जास्त धोका; संशोधकांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:39 PM2020-06-05T12:39:31+5:302020-06-05T12:39:56+5:30
देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजारांपर्यंत पोहोचली असून, या आजाराला बळी पडलेल्यांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. जगभरात आतापर्यंत 65 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 86 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजारांपर्यंत पोहोचली असून, या आजाराला बळी पडलेल्यांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत देशामध्ये दरदिवशी कोरोनाचे चार किंवा पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. गेल्या 15 दिवसांत त्यात अधिक वाढ होत गेली आणि गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे 9 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सामान्यत: श्वास घेण्यास त्रास होण्याचे लक्षणं मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. यावर काही संशोधकांनी रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. या रिसर्चमध्ये श्वसनाचा त्रास जास्त किंवा कमी हा रुग्णांच्या रक्तगटावर आधारित असल्याचे समोर आले आहे.
न्यूज मेडिकल लाइफ सायन्स वेबसाइटनं इटली आणि स्पेनमधील हॉटस्पॉट क्षेत्रातील 1600 रुग्णांचा अभ्यास केला असल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्यांना रुग्णांमध्ये रक्तगट A असणाऱ्यांची संख्या जास्त आढळली आहे. O रक्तगटाच्या लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका Aच्या तुलनेत खूपच कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आतापर्यत A पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णांचा श्वसनाच्या त्रासामुळं जास्त मृत्यू झाला असल्याचे या रिसर्चमधून समोर आले असल्याचे सांगण्यात येत आहे.