जीवघेण्या उष्णतेचा धोका वाढलाय ३५ पटीने; शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 06:01 AM2024-06-23T06:01:26+5:302024-06-23T06:03:09+5:30
सर्वांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे.
वॉशिंग्टन : सर्वांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. गेली अनेक वर्षे वाढत असलेल्या तापमानवाढीमुळे जीवघेणी गरमी वाढण्याचे प्रमाण तब्बल ३५ पट वाढल्याचे जागतिक तापमानवाढीबाबत अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भारतात तसेच जगाच्या इतर भागात मिळून हजारो लोकांचे बळी गेले आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, चालू वर्ष आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बहुतेक प्रदेशांमध्ये पावसाळ्याचे आगमन होण्याच्या आधीच भीषण उष्णतेचा प्रकोप झालेला पहायला मिळतो. (वृत्तसंस्था)
भविष्यात धोका आणखी वाढणार?
- उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना हीट स्ट्रोकचा त्रास होतो. यात शरीराला थंड ठेवणारी यंत्रणा पूर्णपणे मोडून पडते. वेळीच उपाय न केल्यास व्यक्तीचा मृत्यू ओढवतो.
- दुसरीकडे संपूर्ण जगभर हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात वाढ आहे. जीवष्म इंधन जाळल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण केली जात आहे. यामुळे भविष्यात जीवघेणी उष्णता निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
कसा केला अभ्यास?
- या अभ्यासासाठी वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन (डब्ल्यूडब्ल्यूए) नेटवर्कने मेक्सिको, दक्षिण पश्चिम अमेरिका, ग्वाटेमाला, बेलीज, अल साल्वाडोर आणि होंडुरास देशांची निवड केली होती.
- डब्ल्यूडब्ल्यूए यात उत्तर गोलार्धातील सर्वाधिक उष्ण पाच दिवस आणि पाच रात्रीचा अभ्यास केला. जीवाष्म जाळल्याने निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे जागतिक तापमानात वाढ वेगाने होत असल्याचा निष्कर्ष पाहणीतून काढण्यात आला आहे.
- ग्लोबल वाढीसाठी कारणीभूत ठरणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांच्या सरकारने विविध उपाययोजना केल्या पाहिजेत.