वर्गमित्र म्हणून शाळकरी मुलांना सोबत करणार रोबो
By admin | Published: August 16, 2015 10:21 PM2015-08-16T22:21:13+5:302015-08-16T22:21:13+5:30
दक्षिण आॅस्ट्रेलियातील दोन शाळांतील मुलांना वर्गमित्र म्हणून रोबोची (यंत्रमानव) साथसंगत लाभणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम शिकविण्यात
मेलबर्न : दक्षिण आॅस्ट्रेलियातील दोन शाळांतील मुलांना वर्गमित्र म्हणून रोबोची (यंत्रमानव) साथसंगत लाभणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम शिकविण्यात सुधारणा करण्यासाठी रोबोची कशी मदत होऊ शकते, यासाठीचे संशोधन पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियात हाती घेण्यात आले आहे.
तीन वर्षांचा हा संशोधन प्रकल्प आहे. स्वीनबर्न तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पातहत नाऊ रोबोंचा (एनएओ-मानवासारखे) चाचणीदाखल वापर करण्यात येणार आहे. मानवासारखे दिसणारे हे रोबो अलदेबरान रोबोटिक्स या फ्रेंच कंपनीने विकसित केलेली आहेत.
वर्गात मुलांना शिकविण्यासाठी या रोबोंचा कसा वापर करतात, याचे शिक्षण आॅनलाईन सर्वेक्षण करतील. वर्गात शिकविण्यासाठी रोबोचा वापर करताना काय काय अडचणी येतात, याबाबतही शिक्षकांकडून माहिती घेतली जाणार आहे.
रोबोचा सर्वत्र वापर होत असून रोबो समाजाचा एक घटकच बनला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आवश्यक कौशल्यासह प्रशिक्षित करणे, ही आॅस्ट्रेलियातील शाळांची जबाबदारी आहे, असे स्वीनबर्नचे संशोधक डॉ. थेरेस कीन यांनी सांगितले.
शाळेत रोबोचा वापर करण्याचे प्रचलन नवीन नाही. तथापि, विद्यार्थी आणि शिक्षकांना ते मदत करू शकतात, याचा पुरावा आढळत नाही. या तीन वर्षांच्या प्रकल्पात प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम शिकविण्यात सुधारणा करण्यासाठी रोबोची कशी मदत होऊ शकते, याचा पडताळा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे रोबोंच्या शाळेतील उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सांकेतिक लिपी आणि कार्यरचनेबाबत माहिती मिळेल. (वृत्तसंस्था)