कारखान्यात रोबोने घेतला माणसाचा जीव!
By admin | Published: July 3, 2015 03:49 AM2015-07-03T03:49:25+5:302015-07-03T03:49:25+5:30
टर्मिनेटर चित्रपटातील थरारक दृश्यांचा प्रत्यक्ष अनुभव जर्मनीतील फोक्सव्हॅगन या जगप्रसिद्ध वाहननिर्मिती कंपनीच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी घेतला.
बर्लिन : टर्मिनेटर चित्रपटातील थरारक दृश्यांचा प्रत्यक्ष अनुभव जर्मनीतील फोक्सव्हॅगन या जगप्रसिद्ध वाहननिर्मिती कंपनीच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी घेतला.
कंपनीच्या फ्रॅकफर्टपासून १०० कि.मी. अंतरावर असणाऱ्या बौनताल कारखान्यात कामगारांसोबत रोबोही काम करतात. अशाच एका रोबोने सोमवारी एका २२ वर्षांच्या व्यक्तीला अक्षरश: चिरडून ठार मारले.
व्होल्क्सवॅगनचा प्रवक्ता हैको हिलविग याने दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षांचा कंत्राटदार उभ्या असलेल्या रोबोचे भाग जुळवत होता. रोबो तयार होताच त्याने या कंत्राटदाराला पकडले व त्याला समोरच्या धातूच्या प्लेटवर आदळले. त्यानंतर त्याला चिरडून ठार मारले. या घटनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार या दुर्घटनेस मानवी चूकच कारणीभूत आहे. कारण असेम्ब्ली प्रक्रियेत काम करणाऱ्या या रोबोला वाहनाचे विविध भाग गोळा करून ते यंत्रात भरावे लागतात. एरवी निर्धारित जागेत काम करणाऱ्या या रोबोला संधी मिळताच त्याने माणसावर हल्ला चढवला. या दुर्घटनेच्या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या कंत्राटदाराला रोबोने काहीही दुखापत केली नाही. पण या घटनेचे तपशील हिलविग यांनी दिले नाहीत. या घटनेसंदर्भात आरोप ठेवायचे असल्यास ते कोणावर ठेवावे, असा प्रश्न जर्मनीतील पोलिसांना पडला आहे. ब्रिटनमधील पत्रकार साराह ओ कॉनर यांनी ही घटना टिष्ट्वटरवर टाकली, त्यानंतर सोशल मीडियावर या घटनेला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. (वृत्तसंस्था)
चूक माणसाचीच... रोबोला स्वत:ची प्रज्ञा नसते व तो त्याचे ज्याप्रमाणे ‘प्रोग्रॅमिंग’ केले असेल त्याप्रमाणे व तेवढेच काम करतो. या रोबोने त्याच्या भागांची जुळणी सुरू असतानाच त्याचे नियत काम सुरू केले यात दोष त्याचा नाही तर त्याचे प्रोग्रॅमिंग करणाऱ्याचा आहे, हे उघड आहे. रोबो हे काही झाले तरी कृत्रिम व मर्यादित प्रज्ञा असलेले यंत्र आहे. त्यामुळे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणे शक्य नाही.