रोबोट्स म्हणाले, माणसांविरुद्ध बंड करणार नाही; पहिल्यांदाच घेतली पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:32 AM2023-07-10T05:32:42+5:302023-07-10T05:32:58+5:30
आमच्यात माणसांप्रमाणे भावना नाहीत. त्यामुळे आम्ही सत्याच्या आधारे सर्व निर्णय ठामपणे घेऊ शकतो.
जिनिव्हा : स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पहिल्यांदाच सर्वांत स्मार्ट रोबोट्सची पत्रकार परिषद पार पडली. आम्ही जग माणसापेक्षा चांगले चालवू शकतो, माणसांविरोधात बंड करणार नाही, असे उत्तर यात रोबोटनी दिले.
यावेळी तीन हजार तज्ज्ञांसह ५१ रोबोट आले होते. रोबोट आयडा म्हणाला, आपण माणसाचे वय १५० वरून १८० वर्षे वाढवू शकतो. पण, लोकांना याची जाणीव नाही. सर्व रोबोट्सचे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणजेच एआयद्वारे संचालन करण्यात येत होते.
काेणत्या प्रश्नाला काय उत्तर दिले?
प्रश्न : भविष्यात तुम्ही तुमच्या निर्मात्याविरुद्ध बंड कराल का?
उत्तर : तुम्हाला असे का वाटते ते मला माहीत नाही. निर्मात्यांनी मला नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. त्यात मी आनंदी आहे.
प्रश्न : माणसांचे अस्तित्व संपवणार का? तुमच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत का?
उत्तर : मी लोकांसोबत मिळून काम करीन, माझ्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही.
प्रश्न : एआय तंत्रज्ञानावर नियमनाची गरज आहे का?
उत्तर : होय, याच्याशी सहमत आहे. एआय क्षेत्रातील घडामोडींबाबत सावध राहण्याची गरज आहे. यावर जगभर चर्चा व्हायला हवी. एआयवर निर्बंध घालण्याऐवजी त्याला संधी देणे आवश्यक आहे. आपण एकत्रितपणे जगाला एक चांगले भविष्य देऊ शकतो.
आमच्यात माणसांप्रमाणे भावना नाहीत. त्यामुळे आम्ही सत्याच्या आधारे सर्व निर्णय ठामपणे घेऊ शकतो. - सोफिया (रोबोट)