कंदाहार विमानतळावर तालिबानने केले रॉकेट हल्ले, हवाई वाहतूक बंद; अफगाणी लष्कराविरोधात संघर्ष टिपेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:30 AM2021-08-02T08:30:50+5:302021-08-02T08:31:50+5:30
Rocket attacks by Taliban on Kandahar airport: अफगाणिस्तान सरकारचे लष्कर व तालिबान यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला असून कंदाहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले केले.
कंदाहार : अफगाणिस्तान सरकारचे लष्कर व तालिबान यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला असून कंदाहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले केले. त्यामुळे तेथील विमान वाहतूक सध्या काही काळापुरती बंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, अफगाणिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आम्हीही तसेच हल्ले चढविले. कंदाहार विमानतळावर शनिवारी तीन रॉकेटचा मारा करण्यात आला.
कंदाहार विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तुन म्हणाले की, तीनपैकी दोन रॉकेटमुळे धावपट्टीचे नुकसान झाले असून त्यावरून सध्या विमाने ये-जा करणे शक्य नाही. धावपट्टी दुरुस्त झाल्यानंतर तसेच परिस्थिती निवळल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. कंदाहार विमानतळावर रॉकेट हल्ला झाल्याच्या घटनेला अफगाणिस्तानच्या हवाई वाहतूक खात्याच्या प्रवक्त्यानेही दुजोरा दिला.
कंदाहारच्या परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानने जोरदार हल्ले सुरू केले आहेत. हे शहर तालिबान लवकरच ताब्यात घेतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास तालिबानींना आपल्या साथीदारांना रसद पुरविणे अधिक सोयीचे होणार आहे. कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते तालिबानींच्या हाती पडले तर अफगाणी लष्करासाठी ती नामुष्की असेल.
त्या देशातील हेरात व लष्कर गाह ही दोन शहरे तालिबान कधीही ताब्यात घेतील अशी स्थिती आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. ग्रामीण भागात तैनात असलेले अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर त्या भागाची सुरक्षा अफगाणी लष्कराकडे सोपविण्यात आली होती. तिथे आता तालिबानने कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)
निम्मा भाग काबीज केल्याचा दावा
अफगाणिस्तानचा निम्मा भाग आम्ही काबीज केला आहे, असा तालिबानने केलेला दावा त्या देशाच्या सरकारने फेटाळून लावला आहे. मात्र ज्या आक्रमकपणे तालिबान संघर्ष करत आहेत, त्यापुढे अफगाणी लष्कर किती काळ टिकाव धरेल याबद्दल पाश्चात्त्य देशांच्या मनात शंका आहे. इराण व पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला अफगाणिस्तानचा मोठा प्रदेश तालिबानच्या ताब्यात गेला आहे. तालिबानींना आता राजधानी काबूलवर कब्जा करण्याचे वेध लागले आहेत.