काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरावर कोसळलं रॉकेट
By admin | Published: June 6, 2017 01:59 PM2017-06-06T13:59:51+5:302017-06-06T14:07:29+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट कोसळल्याची घटना मंगळवारी घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 06 - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट कोसळल्याची घटना मंगळवारी घडली.
येथील स्थानिक वृत्त वाहिनी टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमधील भारतीय गेस्टहाऊसच्या ग्रीन झोनमधील टेनिस कोर्टवर रॉकेट कोसळून स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. भारतीय राजदूत मनप्रीत व्होरा यांच्यासह आणखी काही भारतीय दूतावासातील अधिकारी या परिसरात राहतात. मात्र, या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याची माहिती देण्यात आली नसून भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात काबूलमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यामध्ये 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 पेक्षा जास्त जखमी झाले. या घटनेनंतर येथील विदेश दूतावास परिसरात सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. तसेच, या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारतीचे थोडे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला.मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे निवासस्थानही आहे.
All are safe in the mission in #Kabul. No report of any casualty so far: sources.
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2017
A rocket lands inside #IndiaHouse, the country"s mission in #Kabul: sources.
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2017