इराकमध्ये संयुक्त फौजेच्या तळावर पुन्हा रॉकेट हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 04:34 AM2020-03-15T04:34:14+5:302020-03-15T04:34:42+5:30
या हल्ल्यांची जबाबदारी आजवर कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र हाशेद अल्-शाबी या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
बगदाद : इराकमध्ये बगदाद शहराच्या उत्तर भागामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजेच्या असलेल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी पुन्हा रॉकेट हल्ले केले. इराकमध्ये अमेरिकी सैनिक व राजदूत राहत असलेल्या ठिकाणांवर गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून झालेला हा २३वा हल्ला आहे. त्यामध्ये किती जीवितहानी झाली त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
या हल्ल्यांची जबाबदारी आजवर कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र हाशेद अल्-शाबी या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. बगदादमधील संयुक्त फौजेच्या तळावर जिथून शनिवारी रॉकेट हल्ले करण्यात आले ते ठिकाण इराकी लष्कराने शोधून काढले आहे.
ढगाळ हवामानामुळे संयुक्त फौजेची टेहळणी यंत्रणा कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी शनिवारी दिवसाढवळ््या लष्करी तळावर रॉकेट हल्ले केले. ताजी या भागामध्ये हा लष्करी तळ आहे. याआधी तीन दिवसांपूर्वी याच तळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात अमेरिका, ब्रिटनचा प्रत्येकी एक सैनिक व एक अमेरिकी कंत्राटदार असे तीन जण ठार झाले होते. त्यानंतर हाशेद अल् शाबी या संघटनेतील इराणचा पाठिंबा असलेल्या काताईब हिजबुल्ला या गटाच्या तळांवर संयुक्त फौजांनी शुक्रवारी प्रत्युत्तरादाखल जोरदार हल्ले चढविले होते. (वृत्तसंस्था)
इराक सरकारवर अमेरिका नाराज
इराण व अमेरिकेच्या संघर्षामुळे आपला नाहक बळी जाईल अशी भीती इराकच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनाही वाटत असते. अमेरिकेने गेल्या वर्षी केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये इराणचा कमांडर कासीम सोलेमानी व हाशेद अल्-शाबीचा उपप्रमुख अबू महदी अल्-मुहांदीज हे दोघे ठार झाले होते. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकी सैनिकांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. सध्या इराकमध्ये ५२०० अमेरिकी सैनिक आहेत. अमेरिकी सैनिक व राजदूत राहत असलेल्या ठिकाणांवर दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी इराक सरकार प्रभावी उपाययोजना करीत नसल्याबद्दल अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.