रोहिंग्या समस्या ; म्यानमारमधील हिंदूंवरही छावणीत राहण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 12:19 PM2018-07-02T12:19:19+5:302018-07-02T12:56:30+5:30
कॉक्स बझारमधील मोठ्या छावणीच्या बाहेर हिंदू कुटुंबांना ठेवण्यात आले आहे. कॉक्स बझारमधील या छावणीमध्ये 11 लाख लोक राहात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्कराने रोहिंग्यांवर कारवाई सुरु केली
कॉक्स बझार- गेल्या वर्षी म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये लाखो रोहिंग्यांनी रखाइन प्रांत सोडून बांगलादेशाच्या दिशेने पलायन केले. हे रोहिंग्या सध्या कॉक्स बझारमधील छावणीमध्ये राहात आहेत. रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांबरोबर हिंदू कुटुंबेही राहात होती. त्यांना रोहिंग्या हिंदू असे संबोधले जाते. मुस्लीम रोहिंग्यांबरोबर या हिंदूंनाही जीव मूठीत धरुन बांगलादेशात यावे लागले. सध्या बांगलादेशातील कॉक्स बझारच्या जगातील सर्वात मोठ्या निर्वासीत छावणीमध्ये 101 हिंदू कुटुंबे राहात आहे. लष्करी कारवाईमुळे त्यांची मोठी फरपट झालेली आहे.
The minority within the minority : @VidyaKrishnan tells the story of Hindu Rohingyas at Cox's Bazaar camps @the_hindu#SundaySpl awaiting a home, as Bangladesh, India and Myanmar governments pass the buck #mustreadhttps://t.co/bDTTI4rBBH
— Suhasini Haidar (@suhasinih) July 1, 2018
कॉक्स बझारमधील मोठ्या छावणीच्या बाहेर हिंदू कुटुंबांना ठेवण्यात आले आहे. कॉक्स बझारमधील या छावणीमध्ये 11 लाख लोक राहात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्कराने रोहिंग्यांवर कारवाई सुरु केली. या कारवाईमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले तसेच लष्कराकडून महिलांवर बलात्कार होण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे रोहिंग्यांबरोबर हिंदूही पळून गेले.
बांगलादेशातील छावणीत हिंदूंच्या वसाहतीजवळ सतत पोलीस पहारा ठेवण्यात आलेला आहे. रंगीत साड्या नेसलेल्या तसेच बांगड्या व कुंकू लावलेल्या महिलांमुळे यांचा परिसर इतर छावणीपेक्षा वेगळा दिसून येतो. तसेच बांबू आणि ताडपत्री वापरून येथे राधाकृष्णाचे एक साधे मंदिरही या लोकांनी तेथे उभे केले आहे. जर छावणीमध्ये काही गोंधळ निर्माण झाला तर या कुटुंबा संरक्षण देणे अवघड होईल म्हणून बांगलादेश सरकारने या कुटुंबांना छावणीच्या बाहेरच ठेवलेले आहे.
1982 साली म्यानमारमध्ये नागरिकत्त्वाचा एक कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार 8 वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे नागरिकत्त्व बेकायदेशीर ठरवण्यात आले. तेव्हापासून सतत रोहिंग्या व स्थानिक म्यानमारी लोक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण तयार होऊन हिंसाचाराच्या घटना घडत गेल्या, 1992 साली म्यानमारमधून काही हजार रोहिंग्या बांगलादेशात पळून गेले होते. पलायनाच्या या घटना आतापर्यंत सुरुच राहिल्या.
हिंदू छावणीचा माझी म्हणजे नेता शिशू शील नावाचा 32 वर्षांचा युवक आहे. रखाइन प्रांतातील मांगटाऊ जिल्ह्यातून त्याने गेल्या 28 ऑगस्ट रोजी पलायन केले होते. द हिंदू या भारतीय वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्याच्या चिकनचारी या संपूर्ण गावानेच पलायन केल्याचे तो सांगतो. त्याच्या गावाच्या शेजारील फकिराबझार येथे लष्कराने केलेल्या कारवाईत 86 हिंदूंचे प्राण गेल्याचे तो सांगतो. आता कॉक्सबझारमधील या हिंदू कॅम्पमध्ये पाल व शील नावाच्या पंथाचे लोक राहात आहेत. म्यानमार सरकारने त्यांना नॅशनल व्हेरिफिकेशन कार्ड दिले आहे त्यावर त्यांचा वंश भारतीय असे नमूद करण्यात आले आहे. शिशू शील म्हणतो, माझे आजोबा तिकडे स्थायिक झाले होते, तेव्हापासून आमचे कुटुंब म्यानमारमध्येच आहे, पण आमच्याकडे भारतातून आलेले पाहुणे अशाच नजरेने पाहिले गेले. आम्हाला नागरिकत्त्व मिळालेच नाही.