बांगलादेशच्या निर्मितीत भारताची भुमिका
By admin | Published: June 2, 2016 02:27 PM2016-06-02T14:27:30+5:302016-06-02T14:27:30+5:30
बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्वाचा हात असून डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती केली
Next
>ऑनलाइन लोकमत -
बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्वाचा हात असून यासाठी भारताला पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं होतं. भारत - पाकिस्तानमधील हे तिसरे युद्द होते. डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती केली.
२७ मार्च १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगलादेशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेकांना भारतामध्ये स्थलांतर केलं. त्यांच्यासाठी सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या होत्या.
पूर्व पाकिस्तानातील हिंसाचारामुळे भारतात येणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण पडू लागला. यादरम्यान अमेरिकेने पाकिस्तानला मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून अमेरिकेला व ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला.
दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.
२३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली आणि युद्धास तयार रहाण्याचे देशवासियांना आवाहन केले. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाला सुरुवात केली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याची पाकिस्तानची योजना होती. पाकिस्तानने हल्ला केल्याने भारताला आक्रमण करण्यासाठी कारण मिळाले आणि दुस-याच दिवशी भारताने युद्ध पुकारले.
पाकिस्तानने युद्ध पुकारले खरे मात्र त्यांना आपली कामगिरी कायम राखती आली नाही. पश्चिम पाकिस्तानातून देखील लष्कराने भारतात अनेक ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. लोंगेवालाच्या लढाईत केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती (रणगाडा) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.
भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगाव येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला.. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या.
भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने डाक्का शहर काबीज केले. ९०,०००हून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले. डिसेंबर १६ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. दुसर्या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली.
भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला व भारताने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. जानेवारी १० १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले.