मोदींचे भूतानमध्ये शाही स्वागत
By admin | Published: June 16, 2014 04:18 AM2014-06-16T04:18:35+5:302014-06-16T04:18:35+5:30
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्याच परदेशी दौऱ्याअंतर्गत भूतान येथे आले असून, भूतानमध्ये त्यांचे शाही स्वागत करण्यात आले
थिम्पू : पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्याच परदेशी दौऱ्याअंतर्गत भूतान येथे आले असून, भूतानमध्ये त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. भारत व भूतान यांच्यातील विशेष मैत्रीचे संबंध अधिक दृढ करणे हा या भेटीचा उद्देश असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
भूतान सरकारने पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत केले, त्यांच्यासाठी खास गार्ड आॅफ आॅनरचे आयोजन करण्यात आले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग तोबगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारो विमानतळावर स्वागत केले.
पंतप्रधान मोदी पारो ते थिम्पू या ५० कि . मी. च्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या मार्गावरून जात असताना रस्त्याच्या दुतर्फा रंगबिरंगी पोशाखात उभ्या नागरिकांनी अभिवादन केले. मोदी यांचे छायाचित्र असणारे होर्र्डिंग्ज रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेले होते. थिम्पू येथे आल्यानंतर मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. (वृत्तसंस्था)