सिगारेट विकल्यानं ५२,००००००००० ₹ दंड; किम जोंग उनकडून ‘बक्षिसी’! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:03 AM2023-05-03T06:03:10+5:302023-05-03T06:03:28+5:30

अमेरिकेनं का केला या कंपनीला एवढा दंड? - कारण या कंपनीनं उत्तर कोरियाला बेकायदेशीर मार्गानं केलेली सिगारेट्सची विक्री!

₹ 52,000,000,000 fine for selling cigarettes; 'Prize' from Kim Jong Un! | सिगारेट विकल्यानं ५२,००००००००० ₹ दंड; किम जोंग उनकडून ‘बक्षिसी’! 

सिगारेट विकल्यानं ५२,००००००००० ₹ दंड; किम जोंग उनकडून ‘बक्षिसी’! 

googlenewsNext

बलाढ्य सिगारेट कंपन्यांनी अख्ख्या जगावर राज्य केलं, असं म्हटलं जातं, कारण त्यांनी सर्वसामान्यांवर ‘प्रभाव’ टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याचबरोबर जगातल्या जवळपास सर्व सरकारांना आपल्या कह्यात घेण्याचा यशस्वी प्रयत्नही त्यांनी केला. कारण त्यांच्याकडे असलेला वारेमाप पैसा. त्यांच्याकडून मिळणाऱ्या निधीचा, त्यांच्यामुळे मिळणाऱ्या करांचा ओढा त्या त्या देशांच्या सरकारांना निश्चितच होता. देशांच्या धोरणांमध्ये या कंपन्यांनी ढवळाढवळ केली, आपल्याला हवे तसे बदल करून घेतले, आजही त्यात फार फरक पडलेला नाही, पण सिगारेट, तंबाखूच्या सेवनानं अख्खी पिढीच बरबाद होत असल्यानं त्यानंतर अनेक देशांनी या कंपन्यांवर मोठे निर्बंध लादले. अर्थात त्यानंही फारसा फरक पडला नाही. कारण ज्यांना सिगारेटचं व्यसन लागलं आहे, अशा लोकांनी मती वाढल्या तरी वापर मात्र सोडला नाही. 

ऑस्ट्रेलियासारख्या देशानं मात्र कायमच सिगारेट कंपन्यांची नाळ आवळण्याचा आणि सर्वसामान्य जनतेला, तरुणांना त्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच्या अनेक कायदेशीर लढाया तर या देशानं लढल्याच, पण सिगारेट कंपन्यांना वरचढ होण्यापासून रोखलं. सिगारेट कंपन्यांच्या बाबतीतली चालू घडामोड आणि सध्या जगभरात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको (बॅट) या कंपनीला अमेरिकेनं केलेला ६३० दशलक्ष डॉलर्सचा दंड! भारतीय चलनात या दंडाची किंमत सुमारे ५२ अब्ज रुपये होते! 

अमेरिकेनं का केला या कंपनीला एवढा दंड? - कारण या कंपनीनं उत्तर कोरियाला बेकायदेशीर मार्गानं केलेली सिगारेट्सची विक्री! ‘बॅट’ ही जगातील प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. २००७ ते २०१७ या काळात कंपनीनं लबाडी, अनेक घोटाळे, भ्रष्टाचार करून विविध ठिकाणी सिगारेट्सची विक्री केली. त्यात प्रतिबंधित उत्तर कोरिया या देशाचाही समावेश होता. या देशाशी व्यावसायिक संबंधांबाबत अमेरिकेनं अनेक कडक निर्बंध लादले आहेत. त्यांचं उल्लंघन करून हा ‘व्यवहार’ झाल्यानं बॅट कंपनीला ही जबर शिक्षा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं स्वत:ही आपण लबाडीनं काही व्यवहार केल्याची कबुली दाखवली आहे. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे हा दंड भरण्याची तयारीही दर्शवली आहे. ५२ अब्ज रुपयांचा दंड भरायला कंपनी सहजपणे तयार होते, याचा अर्थ या कंपनीकडे किती पैसा असावा आणि त्या चोरट्या व्यवहारांतून कंपनीनं स्वत:चं किती उखळ पांढरं केलं असावं, याचा अंदाज बांधता यावा. कंपनीनं अगदी थोड्याच कालावधीत उत्तर कोरियला ३५ हजार कोटी रुपयांची तंबाखू उत्पादनं विकली होती, अशी अधिकृत आकडेवारी आहे. मात्र प्रत्यक्षातली विक्री यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. 

बॅट कंपनीनं केलेल्या हेराफेरीत उत्तर कोरियाचा बँकर सिम ह्योन सोप, चिनी मदतनीस किन गओमिंग आणि हान लिनलिन यांचाही समावेश असल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याची फार आधीच कुणकुण लागल्यानं हे तिन्ही आरोपी अगोदरच पसार झाले आहेत. तथापि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ते लपले असले तरी आम्ही लवकरच त्यांची मानगूट पकडू, असा इशाराही अमेरिकेनं दिला आहे. 

बँकर सिमचा ठावठिकाणा शोधून देणाऱ्यास अमेरिकेनं ४० कोटी रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे, तर इतर दोघांसाठी प्रत्येकी चार-चार कोटींचं इनाम जाहीर केलं आहे. उत्तर कोरियाला सिगारेट्स विकण्यासाठी बनावट कागदपत्रं बनवून देण्यात, या तिघांचा मोठा वाटा होता. या माध्यमातून अमेरिकी बँकांमधून ६०० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. उत्तर कोरियाच्या कंपन्यांना तर या हेराफेरीतून सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. 

‘बॅट’ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सिगारेट कंपनी असून इराण, क्यूबासारख्या अनेक प्रतिबंधित देशांशी या कंपनीचा अजूनही व्यापार आणि व्यवहार सुरू आहे. याबाबत कंपनीनं ‘खेद’ व्यक्त केला असला तरी, प्रतिबंधित देशांशी हे व्यवहार सुरू ठेवले नसते, तर कंपनीला खूप मोठा घाटा सहन करावा लागला असता, त्यामुळेच आम्ही हे नियमबाह्य व्यवहार सुरू ठेवले, असं सांगण्याचा निर्लज्जपणाही कंपनीनं केला आहे. 

किम जोंग उनकडून ‘बक्षिसी’! 
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सततच आपल्या उपद्व्यापांमुळे चर्चेत असतात. त्यांना स्वत:लाही धूम्रपानाचं व्यसन आहे. त्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांच्याकडून अतिरिक्त ‘बक्षिसी’ मिळवण्यासाठीही हे उद्योग केले गेल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्याकडून कंपनीला, कंपनीच्या प्रतिनिधींना किंवा मधल्या दलालांना किती बक्षिसी, खुशाली मिळाली हे अद्याप जाहीर झालेलं नाही, पण तो आकडाही लवकरच फुटण्याची शक्यता आहे.

Web Title: ₹ 52,000,000,000 fine for selling cigarettes; 'Prize' from Kim Jong Un!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.