चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:00 PM2024-11-26T23:00:04+5:302024-11-26T23:00:40+5:30
या चकमकीत पत्रकारांसह 10 जण जखमी झाले आहेत. यांपैकी पाच जणांवर सीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.
चितगाव कोर्ट बिल्डिंग परिसरात आज (२६ नोव्हेंबर) पोलीस आणि चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली. दरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाला. 32 वर्षीय सैफुल इस्लाम असे मृताचे नाव असून तो चितगाव जिल्हा बार असोसिएशनचा सदस्य होता. सीएमसीएच पोलीस कॅम्पचे प्रभारी नूरुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला चितगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.
बांगलादेशी वेबसाइट द डेली स्टारनुसार, चिन्मय दास यांच्या अटकेनंतर परिस्थिती आणखी चिघळताना पाहून पोलीस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (BGB) जवानांनी व्हॅनचा मार्ग मोकळा करण्यासाठी साउंड ग्रेनेड डागले आणि लाठीचार्ज केला. चट्टोग्राम जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने डेली स्टारला दिलेल्या माहितीनुसार, "चकमकीदरम्यान, न्यायालयाच्या आवारात निदर्शने करणाऱ्या काही चिन्मय समर्थकांनी दुपारी 3.30 च्या सुमारास सैफुलला रंगम कन्व्हेन्शन हॉलमध्ये ओढले आणि त्याच्यावर हल्ला केला."
चकमकीत पत्रकारांसह 10 जण जखमी -
गोलम रसूल मार्केटमधील कर्मचारी मोहम्मद दीदार आणि इतर काही स्थानिकांनी सैफुलला वाचवले आणि रुग्णालयात नेले. रंगम कन्व्हेन्शन हॉलच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर चिन्मय यांच्या काही समर्थकांनी वकिलावर हल्ला केला. या चकमकीत पत्रकारांसह 10 जण जखमी झाले आहेत. यांपैकी पाच जणांवर सीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.
न्यायालयाने चिन्मय दास यांचा जामीन फेटाळला -
तत्पूर्वी, महानगर दंडाधिकारी काझी शरीफुल इस्लाम यांनी सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते चिन्मय दास यांना बांगलादेशी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून तुरुंगात पाठवले. दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच त्याच्या समर्थकांनी निदर्शने सुरू केली आणि चितगाव इस्कॉनचे माजी विभागीय संघटक सचिव चिन्मय यांना घेऊन जाणाऱ्या जेल व्हॅनला रोखण्याचा प्रयत्न केला. हे थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि साउंड ग्रेनेडचा वापर केला.