14 वर्षांपुर्वी बलात्कार करुन धिंड काढण्यात आलेली 'ती' रॅम्पवर चालली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 11:03 AM2016-11-03T11:03:28+5:302016-11-03T13:29:56+5:30
14 वर्षांपुर्वी सामूहिक बलात्कार करुन नग्न धिंड काढण्यात आलेल्या मुख्तार मई यांनी एका फॅशन शोमध्ये सहभाग घेत रॅम्पवॉक केला आणि जिद्द म्हणजे काय असतं दाखवू दिलं
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 3 - जिद्द म्हणजे काय असते याचा प्रत्यय पाकिस्तानमधील एका फॅशन शोमुळे आला. यावेळी रॅम्पवर मुख्तार मई यांनी रॅम्पवॉक केला. मुख्तार मई या सामान्य महिला नसून जिद्दीच्या जोरावर आपलं आयुष्य त्यांनी पुन्हा सावरलं आहे. 14 वर्षांपुर्वी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, इतकंच नाही तर नग्न धिंडही काढण्यात आली होती. मात्र त्यांनी याविरोधात लढा देत पुन्हा आपल्या आयुष्याला सुरुवात केली. मंगळवारी जेव्हा त्या रॅम्पवर उतरल्या तेव्हा सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं. इतर महिलांनीही आपल्यापासून प्रेरणा घ्यावी असं मुख्तार मई यांना वाटतं. कराचीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. शहरातील अनेक प्रतिष्ठीत लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
महिलांमध्ये धैर्य आणि आशेचा किरण निर्माण व्हावा यासाठी मुख्तार मई प्रयत्न करत आहेत. 'मी जर एक पाऊल उचलत असेन आणि त्यामुळे एका महिलेला जरी प्रेरणा मिळाली तर मला आनंद मिळेल', अशी भावना मुख्तार मई यांनी व्यक्त केली आहे.
2002 मध्ये पंचायतीने मुख्तार मई यांच्यावर सामूहिक बलात्कार करुन नग्न धिंड काढण्याची शिक्षा सुनावली होती. पण ज्यासाठी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती तो गुन्हा त्यांनी केलाच नव्हता. त्यांच्या भावाने गावातील प्रमुखाच्या कुटुंबातील महिलेशी संबंध ठेवले होते, त्यासाठी मुख्तार मई यांना शिक्षा सुनावण्यात आली होती.
पण या घटनेनंतर गावातील इतर महिलांप्रमाणे आत्महत्या करण्याऐवजी मुख्तार मई यांनी लढा द्यायचं ठरवलं. मुख्तार मई सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि दाद मागितली. सामूहिक बलात्कार करणा-या 14 जणांवर खटला दाखल करण्यात आला, यातील सहा जणांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. मात्र नंतर त्यांची सुटका झाली.
पण यामुळे मुख्तार मई यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या वकील झाल्या. मीरवाला येथे त्यांनी महिलांसाठी राहण्याची व्यवस्था केली असून मुलींसाठी शाळा बांधली आहे. तुमच्यासोबत एखादी दुर्घटना झाली असेल तर तो आयुष्याचा शेवट नाही असं मुख्तार मई सांगतात. 'माझ्याप्रमाणे दुख: भोगणा-या महिलांचा आवाज मला व्हायचं आहे. आपण दुबळे नाही आहोत, आपल्याकडेही डोकं आणि ह्रदय आहे, आपणही विचार करु शकतो', असं मुख्तार मई बोलल्या आहेत. 'अन्याय होत असेल तर आशा सोडू नका, एक दिवस आपल्याला न्याय नक्की मिळेल,' असंही मुख्तार मई यांनी म्हटलं आहे.