चीनने बांधली वादग्रस्त बेटावर धावपट्टी
By admin | Published: October 9, 2014 03:10 AM2014-10-09T03:10:41+5:302014-10-09T03:10:41+5:30
व्हिएतनामचा दावा असणाऱ्या एका बेटावर चीनने धावपट्टीचे काम पूर्ण केले असून, लष्करी विमान तिथे उतरवण्याची सोय केली आहे
बीजिंग : व्हिएतनामचा दावा असणाऱ्या एका बेटावर चीनने धावपट्टीचे काम पूर्ण केले असून, लष्करी विमान तिथे उतरवण्याची सोय केली आहे. या बेटावर चीन आपला हक्क सांगत आहे. वूडी आयलँड असे या बेटाचे नाव असून, पॅरासेल साखळी बेटांचा हा एक भाग आहे, असा चीनचा दावा आहे, पॅरासेल साखळी बेटावर व्हिएतनाम व तैवान यांचाही दावा आहे.
या बेटावरील तेलाचे उत्खनन व बांधकाम यावर व्हिएतनामने आक्षेप घेतला आहे. विमानासाठी धावपट्टी हे चीनचे या बेटावरील नवे बांधकाम आहे. दोन वर्षांपूर्वी या बेटावरील सान्शा शहराचे नाव चीनने याँगशिंग असे ठेवले आहे.
या बेटावरून दक्षिण चीन समुद्रावर नियंत्रण ठेवता येते,त्यामुळे चीन त्यावर आपला दावा सांगत आहे.
फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई व तैवान यांचाही या समुद्राच्या भागावर दावा आहे. या बेटावर चीनने आॅईल रिगही बसविली असून, मे महिन्यात ही रिग बसविल्यानंतर व्हिएतनाममध्ये दंगली उफाळल्या होत्या.
भारत अमेरिकेला इशारा
बीजिंग- दक्षिण चीन समुद्रातील वादात भारत व अमेरिका यांनी हस्तक्षेप करू नये. चीन संबंधित देशांशी थेट वाटाघाटी करेल व सागरी सीमेची ही समस्या सोडविली, जाईल असे चीनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)