रुपया चालणार... भारत-यूएईची स्थानिक चलनांमध्ये व्यापार सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:28 AM2023-07-16T10:28:45+5:302023-07-16T10:29:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात चर्चा
अबुधाबी : भारत आणि यूएई यांनी शनिवारी त्यांच्या चलनांमध्ये व्यापार समझोता सुरू करण्यास आणि भारतीय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसला गल्फ देशाच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी (आयपीपी) जोडण्याचे मान्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल
नाह्यान यांच्याशी येथे व्यापक चर्चा केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातच्या एकदिवसीय दौऱ्यावर शनिवारी अबुधाबी येथे पोहोचले.
यूएईच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-यूएई व्यापारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांमधील सामंजस्य करारांबद्दल बोलताना मोदी म्हणाले, ‘भारत-यूएई सहकार्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. यामुळे आर्थिक सहकार्याचा मार्ग मोकळा होईल आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परस्पर संवाद अधिक सुलभ होईल.’ (वृत्तसंस्था)
भावाचे प्रेम मिळाले
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना भेटणे नेहमीच आनंददायी आहे. त्यांची ऊर्जा आणि विकासाची दृष्टी वाखाणण्याजोगी आहे. आम्ही सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांना चालना देण्याच्या मार्गांसह भारत- यूएईसंबंध आणखी दृढ करण्यावर चर्चा केली. दोन्ही देशांच्या चलनांमध्ये व्यापार समझोत्यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याकडून भावाचे प्रेम मिळाले. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
तुम्हाला सच्चा मित्र मानतो
आमच्या देशांमधील संबंध ज्या पद्धतीने विस्तारले आहेत, त्यात तुम्ही मोठे योगदान दिले आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला एक सच्चा मित्र मानते.
- शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, अध्यक्ष, यूएई
दोन्ही देशांच्या बँकांत करार
भारतीय रिझर्व्ह बँक आणि यूएईच्या सेंट्रल बँक यांनी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक फ्रेमवर्क स्थापित करणे, तसेच सीमापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि यूएईचा दिरहम आणि त्यांच्या पेमेंट आणि मेसेजिंग सिस्टमला एकमेकांशी जोडण्यासाठी सहकार्य करणे, यांचा यात समावेश आहे.
पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद बिन झायेद यांच्या उपस्थितीत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि यूएईच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर खालेद मोहम्मद बलमा यांनी या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. स्थानिक चलनांचा वापर यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून पैसे पाठवण्यासह व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.
भारत सर्वात मोठा दुसरा व्यापारी भागीदार
n भारत हा यूएईचा दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे आणि द्विपक्षीय व्यापार ८४ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
n दुसरीकडे, यूएई भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी सहकारी आणि दुसरे सर्वांत मोठे निर्यात ठिकाण आहे.
n २०२२-२३ मध्ये यूएई हे भारतासाठी थेट विदेशी गुंतवणुकीचा चौथा सर्वांत मोठा स्रोत होता. यूएईतील भारतीय लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे.
n २०२१ मध्ये यूएईत भारतीय नागरिकांची संख्या सुमारे ३५ लाख होती. यूएईमध्ये भारतीय सिनेमा आणि योग खूप लोकप्रिय आहेत.