अबब! सोन्याचा डोंगर खणून काढण्यासाठी झुंबड; ग्रामस्थांना कुणकुण लागली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:19 AM2021-03-25T07:19:29+5:302021-03-25T07:19:51+5:30

गरिबातल्या गरिबालाही आपल्याकडे गुंजभर तरी सोने असावे, अशी इच्छा असते. अर्थात ही झाली भारतातली बाब. भारतीयांना सोने या मौल्यवान धातूचे प्रचंड आकर्षण आहे.

Rush to dig up a mountain of gold; The villagers got angry and ... | अबब! सोन्याचा डोंगर खणून काढण्यासाठी झुंबड; ग्रामस्थांना कुणकुण लागली अन्...

अबब! सोन्याचा डोंगर खणून काढण्यासाठी झुंबड; ग्रामस्थांना कुणकुण लागली अन्...

Next

सोन्याविषयी जगात सर्वाधिक आकर्षण भारतीयांनाच आहे, असा आपला समज आहे. मात्र, या समजाला छेद दिलाय  एका घटनेने. काँगोमधल्या कोणत्या तरी छोट्याशा गावात एका डोंगरावर म्हणे सोने असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली आणि पंचक्रोशीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पुढे काय झाले, त्याची ही रंजक कथा...

गरिबातल्या गरिबालाही आपल्याकडे गुंजभर तरी सोने असावे, अशी इच्छा असते. अर्थात ही झाली भारतातली बाब. भारतीयांना सोने या मौल्यवान धातूचे प्रचंड आकर्षण आहे. अवघ्या भरतखंडात एकेकाळी निघणाऱ्या सोन्याच्या धुरामुळे असेल कदाचित; पण सोन्याचे आकर्षण भारतीयांना सर्वाधिक आहे, हे वास्तव कोणीही नाकारत नाही. “अडीअडचणीला सोनेच कामाला येते,” हे प्रत्येक घरात कधी ना कधी उच्चारले गेलेले वाक्य!  सोन्यातली गुंतवणूक ही सर्वांत सुरक्षित आणि परताव्याची हमी असलेली समजली जाते. त्यामुळेच सोने बाळगणे हा प्रत्येकासाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. त्यामुळेच सोन्याचा सोस असलेले देश असो वा व्यक्ती, ते चर्चेचा विषय ठरतात.

तर आता काँगोमधल्या सोन्याच्या डोंगराबद्दल! आफ्रिका खंडातील काँगो या देशाच्या दक्षिण किवु प्रांतात एक छोटे गाव आहे, लुहिही नावाचे. या गावात एक छोटा डोंगर आहे. या डोंगरात थोडे खणले की सोने हाती लागत असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. डोंगराच्या पोटात दडलेले सोने खणून काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. लोकांनी कुदळी, फावडे हातात घेऊन डोंगर फोडायला सुरुवात केली. ज्यांना काही मिळाले नाही त्यांनी चक्क हाताने माती कोरायला सुरुवात केली. हा हा म्हणता ही बातमी पंचक्रोशीत पसरली आणि डोंगराला लोकांचा वेढाच पडला. ज्यांना सोने हाती लागले त्यांनी ते  घरी नेले. स्वच्छ पाण्याने धुऊन काढले. लोकांची उडालेली झुंबड, त्यांनी डोंगर खणायला केलेली सुरुवात, मिळालेल्या कच्च्या सोन्याची स्वच्छता या सगळ्या गोष्टींच्या ध्वनिचित्रफिती  समाजमाध्यमांवर सैरावैरा (व्हायरल) झाल्या आणि जगभरात खळबळ उडाली. या प्रकरणाची तातडीने दखल घेत काँगो सरकारने लुहिही गावात जाणाऱ्यांवर बंदी घातली तसेच ५० किमीपर्यंतचा परिसर सील केला. सोने ज्या डोंगरावर सापडले त्याभोवती कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली. परिसरात सुरू असलेले खनिकर्मही पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आले आहे. पुढे काय झाले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आफ्रिकेतला आकाराने दुसरा तर जगातला ११व्या क्रमांकाचा देश म्हणून काँगोची ओळख आहे.  सतत युद्धग्रस्त असलेल्या काँगोमध्ये प्रचंड गरिबी आहे. टोळ्यांचे युद्ध या देशाच्या पाचवीलाच पूजलेले. अशा या देशाच्या उत्तर किवू, दक्षिण किवू आणि आयतुरी या प्रांतांमध्ये भूगर्भात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्यामुळे या भागात खनिकर्म करणारे हौशे-नवशे खूप असतात. त्यांना मुख्यत: सोन्याचा हव्यास अधिक. जमिनीच्या पोटात दडलेले सोने बाहेर काढून त्याची तस्करी करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट. टोळ्याच तयार झाल्या आहेत त्यांच्या. एका अहवालानुसार काँगोमध्ये ९० टक्के हौशी खाण कामगार आहेत. त्यापैकी ६४ टक्के लोकांना सशस्त्र टोळ्यांचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे काँगोचे वर उल्लेखलेले तीनही प्रांत टोळीयुद्धाने ग्रस्त असतात. काँगोमध्ये सातत्याने होणाऱ्या यादवीमुळे तेथे कायमच हुकूमशाहीच असते. या सर्व पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी काँगोवर अनेकदा निर्बंध लादले आहेत.

वस्तुत: उत्तर आणि दक्षिण किवू आणि आयतुरी हे तीनही प्रांत सोन्याच्या खाणींनी समृद्ध आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत या तीनही प्रांतांतून एकत्र मिळून केवळ ६० किलो कच्चे सोने सापडल्याची  सरकार-दरबारी नोंद आहे. परंतु हे सर्व बनावट आहे. एकट्या आयतुरी प्रांतातून तब्बल १ टन सोन्याची छुप्या मार्गाने तस्करी करण्यात आल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात आहे. याच सोन्याची दिवसाढवळ्या सरकारमान्यतेने अधिकृतरीत्या निर्यात केली गेली असती तर काँगो सरकारच्या तिजोरीत १८ लाख डॉलरची भर पडली असती. एका जर्मन संस्थेच्या  अहवालानुसार काँगोमध्ये जेवढे प्रांत आहेत, त्या प्रांतांतून सोने अधिकृतरीत्या भूगर्भातून खणून काढल्यास दरवर्षी त्यातून १५ ते २० टन सोन्याची निर्मिती होऊ शकते. एवढे सारे असूनही काँगो कफल्लक आहे. त्यास तेथील भ्रष्ट शासनप्रणाली जबाबदार आहे. देशातील हिंसाचाराला कंटाळून अनेक नागरिक परदेशात परागंदा झाले आहेत. काँगोतील अनेक पीडितांनी युगांडात आश्रय घेतला आहे. 

हे छुपे सोने जाते कुठे?
जमिनीच्या गर्भातून काढलेले सोने युगांडात छुप्या मार्गाने पाठवले जाते. तेथून पुढे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचविले जाते. आपण मोठ्या कष्टाने भूगर्भातून काढलेले सोने नेमके जाते कुठे, याचा थांगपत्ता हौशी खाण कामगारांना नसतो. खनिकर्म करता करता ठेकेदाराची नजर चुकवून किडूकमिडूक सोने लपवून त्याची विक्री नंतर बाजारात करणे, हेच त्यांचासाठी मोठे दिव्य असते. जिवावर उदार होऊन काही जण ते करतातही. मात्र, त्यानंतर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागते.

Web Title: Rush to dig up a mountain of gold; The villagers got angry and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं