"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 04:45 PM2024-05-09T16:45:44+5:302024-05-09T16:46:50+5:30
Russia Nuclear Bomb warning to America: रशिया पाश्चिमात्य देशांच्या कोणत्याही हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, असेही पुतिन म्हणाले.
Russia Nuclear Bomb warning to America: रशिया पाश्चिमात्य देशांच्या कोणत्याही इशाऱ्याला किंवा हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, आमच्याकडचे अणुबॉम्ब नेहमीच सज्ज असतो, असे मोठे विधान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले. रशियाच्या वार्षिक विजय परेडमध्ये बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ब्रिटन आणि अमेरिकेवर जोरदार टीका केली. सध्या रशिया आणि पाश्चिमात्य देश यांच्यात शीतयुद्ध सुरु असून तणाव वाढत चालला आहे. याबाबत बोलताना, पुतिन यांनी रशियाच्या अण्विक सामर्थ्याचा उल्लेख करत इतर बड्या देशांना इशारा दिला. तसेच दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या भूमिकेबद्दल पुतीन यांनी जोरदार टीका केली. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात 9 मे रोजी एक परेड आयोजित केली जाते. या परेडमध्ये पुतीन यांनी रशियाच्या अणुशक्तीबाबतचा इशारा दिला.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विजय परेडमधील भाषणात अमेरिका, ब्रिटन आणि पाश्चात्य देशांना स्पष्ट इशारा दिला आणि सांगितले की रशिया अण्वस्त्रांनी सज्ज आहे. ते म्हणाले, "विजय दिवस आपल्या पिढ्यांना एकत्र आणतो. आम्ही शतकानुशतके जुन्या परंपरांचा आदर ठेवत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की एकत्रितपणे आम्ही रशियाचे स्वतंत्र आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू. रशिया जागतिक संघर्ष रोखण्यासाठी सर्व काही करेल परंतु रशियाला उगाचच कोणीही डिवचू नये. आमचे सामरिक सैन्य नेहमीच युद्धासाठी तयार असते. रेड स्क्वेअरमधील कार्यक्रमात पुतिन यांनी त्यांची आण्विक ब्रीफकेस देखील धरली आणि तीन विशाल यार्स आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.
रशियाला शांततापूर्ण भविष्य हवे आहे परंतु पाश्चात्य उच्चभ्रू देश रशियाचा द्वेष करतात. त्यांना 'रशियाफोबिया' झाला आहे. रशियाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी विविध प्रकारे पावले उचलली जात आहेत, परंतु रशिया त्यांच्याशी लढत राहिल आणि आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे, असे पुतीन यांनी ठणकावले.