रशियात 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा देत तरुणाचा पोलिसावर चाकू हल्ला
By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 02:47 PM2020-10-30T14:47:53+5:302020-10-30T14:48:13+5:30
जखमी पोलिसाच्या सहकाऱ्याच्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू
मॉस्को: फ्रान्समधील नीस शहरातल्या चर्चमधील हल्ल्याची घटना ताजी असताना आता रशियामध्येही असाच प्रकार घडला आहे. एका १६ वर्षीय मुलानं 'अल्लाहू अकबर'ची घोषणा देत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. हल्लेखोरानं तीनवेळा पोलीस कर्मचाऱ्यावर वार केले. यानंतर जवळच असलेल्या दुसऱ्या एका पोलिसानं हल्लेखोरावर गोळी झाडली. त्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला.
रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सनं दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराकडे चाकू आणि पेट्रोल बॉम्ब होता. त्यानं चाकूनं पोलिसांवर तीन वार केले. रशियाच्या कुक्मोर शहरात ही घटना घडली. या भागात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. या भागात फ्रान्सविरोधात आंदोलनही झालं होतं. रशियाच्या तपास यंत्रणांनी ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाशी संबंधित दोघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार
पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याआधी हल्लेखोरानं 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. त्यानं पोलिसांना 'काफिर'देखील म्हटलं. हल्लेखोर तरुण पोलीस ठाण्याच्या इमारतीत आग लावण्याच्या उद्देशानं आला होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य
फ्रान्समधील हल्लेखोराच्या हातात कुराण
फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अँटी टेररिझम प्रोसीक्युटरच्या म्हणण्यानुसार, नीसच्या चर्चमध्ये घुसून तीन जणांना ठार मारणारा व्यक्ती हा ट्युनिशियाचा नागरिक आहे. २० वर्षांचा हा मुलगा इटलीमार्गे फ्रान्समध्ये दाखल झाला होता. कुराण आणि चाकू हाती घेऊन तो चर्चमध्ये घुसला होता असं तपासात आढळून आलं आहे.
या प्रकरणाचा तपास करणार्या दहशतवादविरोधी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा माणूस भूमध्य सागरी भागातल्या लम्पेडुसा या बेटावरुन २० सप्टेंबरला इटलीला आला होता. त्यानंतर तो ९ ऑक्टोबर रोजी इटलीहून पॅरिसला पोहोचला. त्याच्या फ्रान्सला पोहोचल्याची माहिती इटालियन रेडक्रॉसच्या एका व्यक्तीच्या कागदपत्रातून समोर आली आहे. ट्युनिशियाच्या हल्लेखोराने हातात कुराण धरले होते. त्याने चर्चमध्ये प्रवेश केला आणि धारदार चाकूने लोकांवर हल्ला केला. नीस शहरात तीन महिन्यांत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांना इस्लामिक कट्टरतावादाशी जोडले जात आहे. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नीसमध्ये एका व्यक्तीने चाकूने वार करून तीन जणांना ठार केले. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्येही अशीच एक घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले आहेत की, फ्रान्स पुन्हा 'दहशतवादी हल्ल्याचा बळी पडला आहे'. फ्रान्सवरील हल्ला देशाच्या स्वातंत्र्याचे मूल्य आणि दहशतीपुढे झुकू नयेत या उद्देशाने केला गेला. इतकेच नव्हे तर इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतरही फ्रान्स आपली मूल्ये सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.