रशिया करू शकेल अमेरिकेलाही लक्ष्य!
By Admin | Published: October 27, 2016 02:39 AM2016-10-27T02:39:32+5:302016-10-27T02:39:32+5:30
अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील लक्ष्यांचा थेट वेध घेऊ शकेल असे ‘आरएस-२८ सरमत’ नावाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र रशिया विकसित
मॉस्को : अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील लक्ष्यांचा थेट वेध घेऊ शकेल असे ‘आरएस-२८ सरमत’ नावाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र रशिया विकसित करीत असून सन २०१८ च्या अखेरपर्यंत ते रशियन सैन्यदलांच्या सेवेत दाखल होईल.
शीतयुद्धाच्या काळातील जुनी आण्विक क्षेपणास्त्रे मोडित काढून नवी अधिक भेदक क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. रशियाकडील सध्याचे अशा प्रकारचे आण्विक क्षेपणास्त्र त्याच्या संहारक शक्तिमुळे ‘सतान’ (सैतान) या नावाने ओळखले जाते. त्यामुळे आणखी प्रगत आवृत्तीस ‘सतान-२’ म्हटले जात आहे.
हिरोशिमा व नागासाकीवर सन १९४५ मध्ये टाकले त्याच्या दोन हजार पट अधिक संहारक शक्ती असलेले अणूबॉम्ब वाहून नेण्याची ‘आरएस-२८ सरमत’ ची क्षमता असेल. शत्रुच्या रडार यंत्रणेला पूर्णपणे चकवा देत ते १० किमी अंतरावर असलेल्या लक्ष्याचाही वेध घेऊ शकेल.
‘गिझोमोदो’’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र एका वेळी १६ अणुबॉम्ब वाहून नेऊ शकेल व त्याचा कमाल वेग सेकंदाला ७ किमीपर्यंत पोहोचू शकेल. ही क्षमता आणि पल्ला लक्षात घेता अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील लक्ष्यांखेरीज पॅरिस व लंडनसारखी युरोपीय शहरेही या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात येऊ शकतील. शीतयुद्धाच्या काळात तैनात केलेल्या मूळ ‘सतान’ अण्वस्त्रांचा सेवाकाळ संपत आल्याने त्यांची जागा घेणारी नवी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आपण विकसित करणार असल्याचे रशियाने सन २०१३ मध्ये जाहीर केले होते. रशियन सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, नवी ‘सतान-२’ आण्विक क्षेपणास्त्रे
सन २०१८ च्या अखेरीस सैन्यदलांच्या सेवेत रुजू व्हायला सुरुवात
होईल. (वृत्तसंस्था)
‘सैतान-२’ची वैशिष्ट्ये
एका वेळी 16 अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता
शत्रुच्या रडारच्या पडद्यावर अजिबात दिसणार नाही.
या अणुबॉम्बची संहारक क्षमता हिरोशिमा व नाकासाकी बेचिराख करणाऱ्या अणुबॉम्बच्या 2000 पट आहे.
10000 किमी. मारक पल्ला आणि कमाल वेग ७ किमी प्रति सेकंद.