लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण केल्याचा रशियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:14 AM2020-08-03T01:14:21+5:302020-08-03T01:15:15+5:30
आता नोंदणीचे काम सुरू; तिसरा टप्पा वगळल्याची चर्चा
मॉस्को : रशियातील मॉस्को शहरातील गॅमेलिया इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे त्या देशाने जाहीर केले आहे. आता या लसीच्या नोंदणीचे काम सुरू आहे असे वृत्त रशियातील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा रशियाने पूर्ण केलेला नाही, अशी शंका जगभरातील शास्त्रज्ञांनी बोलून दाखविली आहे.
ही लस येत्या आॅक्टोबर महिन्यात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे रशियाच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे. ही लस देशात सर्वप्रथम डॉक्टर व शिक्षकांना टोचली जाईल. मानवी चाचण्यांचे तीनही टप्पे पूर्ण झाले आहेत की, केवळ पहिला व दुसरा टप्पाच पूर्ण झाला आहे, याबद्दल रशियाच्या आरोग्य खात्याने स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. रशियाने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून तिसऱ्या टप्प्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार असल्याचे तास या वृत्तसंस्थेने म्हटले होते. मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण होण्यास काही महिने जातात. मात्र, कोरोना साथीने जगभरात घातलेला धुमाकूळ पाहता अनेक देशांनी मानवी चाचण्या जलदगतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रशियाने ज्या गतीने या लसीच्या चाचण्या पार पाडल्या त्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली.
अमेरिकेची विरोधी भूमिका...
अमेरिकेतील कोरोना प्रतिबंधक कृती गटाचे सदस्य डॉ. अँथनी फौसी यांनीही रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या गुणवत्तेविषयी शंका घेणारे वक्तव्य नुकतेच केले होते. चीननेही एका कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे; पण तिच्याही विश्वासार्हतेविषयी जगभरातील शास्त्रज्ञांना शंका आहे.