रशिया युद्धाच्या तयारीत? यूरोपच्या सीमेवर '80 हजार' सैनिकांसह रणगाडे, मिसाइल्स तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:33 PM2021-04-13T19:33:58+5:302021-04-13T19:40:37+5:30
या पार्श्वभूमीवर, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि टर्कीसह अनेक देश नाटोमध्ये सामील असलेल्या युक्रेनच्या बाजूने उघडपणे उभे राहिले आहेत. तर, रशियानेही जगभरातील अनेक देशांचा दबाव झुगारून सीमेवर शस्त्र आणि सैन्य शक्ती वाढवली आहे.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. रशियाने आपले हजारो सैनिक, मिसाइल्स आणि रणगाडे पूर्व यूरोपच्या सीमेवर तैनात करायला सुरुवात केली आहे. या भागावर 2014 पासूनच रशियन समर्थक फुटिरतावाद्यांनी कब्जा केलेला आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने पूर्व युरोपातील डोनबास भागात सेन्य तैनात केले आहे. डोनबासच्या वोरोनेक आणि क्रासनोडरमध्ये तोफा आणि मिसाइल्स इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोंच्या माध्यमाने दिसू शकतात. रशियाने यूक्रेनच्या पूर्वे सीमेवर 80 हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. यामुळे रशिया युक्रेनवर कब्जा करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पूर्व युक्रेनमधील स्थिती अत्यंत अस्थिर आहे. येथे ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत, ते पाहता, युद्धाचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि टर्कीसह अनेक देश नाटोमध्ये सामील असलेल्या युक्रेनच्या बाजूने उघडपणे उभे राहिले आहेत. तर, रशियानेही जगभरातील अनेक देशांचा दबाव झुगारून सीमेवर शस्त्र आणि सैन्य शक्ती वाढवली आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शंकाही वर्तवली जात आहे.
याशिवाय स्थानिक पातळीवर डोनेट्स्क आणि लुहेन्स्क भागांतही रशियाला समर्थन मिळालेले आहे. रशिया युक्रेनच्या या भागांतही बंड भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मानले जात आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेंस्की यांनी काही दिवसांपूर्वीच सीमावर्ती भागांचा दौरा केला होता.
यासंदर्भात बोलताना आपण रशियाविरोधात नाटो देशांच्या कारवाईचे समर्थन करू, असे जर्मनीने म्हटले आहे. रशियाची भूमिका पाहता अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात आपल्या दोन युद्ध नौका पाठविण्याच्या तयारीत आहे. मात्र, अमेरिका आणि जर्मनीच्या भूमिकेनंतरही रशियाने आपले सैन्य अद्यापही मागे घेतलेले नाही.