धोकादायक! रशिया-उत्तर कोरिया एकत्र येणार; पुतिन-किम जोंग उन हात मिळवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 07:25 PM2022-08-15T19:25:07+5:302022-08-15T19:25:37+5:30
उत्तर कोरियाच्या मुक्ती दिनानिमित्त किम यांना लिहिलेल्या पत्रात पुतिन यांनी उत्तर कोरियाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.
मॉस्को - एकीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी पाश्चिमात्य देशांची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनही अनेकदा आपल्या शस्त्रास्त्रांची धमकी देत असतो. या दोन्ही नेत्यांनी जगात दहशत निर्माण केली आहे. पण जरा कल्पना करा की दोघे एकत्र आले तर? असेच काहीसे घडणार आहे कारण पुतिन यांनी म्हटलंय की, रशिया उत्तर कोरियाशी संबंध वाढवणार आहे. सध्या दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे आणि एकमेकांना देण्यासाठी खूप काही आहे. असं तज्ज्ञांचे मत आहे.
प्योंगयांगच्या सरकारी माध्यमांनुसार, पुतिन यांनी किम जोंग उन यांना सांगितले आहे की दोन्ही देश "सामायिक प्रयत्नांद्वारे सर्वसमावेशक आणि रचनात्मक द्विपक्षीय संबंध वाढवतील." उत्तर कोरियाच्या मुक्ती दिनानिमित्त किम यांना लिहिलेल्या पत्रात पुतिन म्हणाले की, जवळचे संबंध दोन्ही देशांच्या हिताचे असतील आणि कोरियन द्वीपकल्प, ईशान्य आशियाई क्षेत्राची सुरक्षा आणि स्थिरता मजबूत करण्यास मदत करतील. KCNA न्यूज एजन्सीने ही माहिती दिली आहे.
रशिया आणि उत्तर कोरियाची मैत्री
किम यांनीही पुतिन यांना एक पत्रही पाठवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, "कोरियन द्वीपकल्पावर कब्जा करणाऱ्या दुसऱ्या महायुद्धात जपानवर विजय मिळविल्यानंतर रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली. तेव्हापासून "शत्रू शक्तींकडून" धमक्यांना रोखण्यासाठी दोन्ही देशांमधील "सामग्री आणि धोरणात्मक सहकार्य, समर्थन आणि एकता" अधिक उंचीवर पोहोचली आहे असं पत्राला प्रत्युत्तर दिले.
युक्रेन युद्धात उत्तर कोरिया सैन्य उतरवणार
प्योंगयांगने "शत्रू शक्ती" ची ओळख उघड केली नाही परंतु सामान्यतः अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा संदर्भ देण्यासाठी असे शब्द आणि भाषा वापरली आहे. अलीकडेच एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, युक्रेन युद्धात मोठ्या संख्येने सैनिक गमावल्यानंतर रशिया आता उत्तर कोरियाकडून १ लाख सैनिकांची मागणी करत आहे आणि त्या बदल्यात कच्चे तेल आणि गहू देण्याची ऑफर दिली आहे.
कोरियन सैन्य पूर्व युक्रेनमध्ये तैनात करणार
रशियाच्या ऑफरनंतर उत्तर कोरियानेही तयारी केल्याचं बोललं जात आहे. रेग्नम वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरियानं स्पष्ट केलंय की, ते युद्धातील नुकसान भरपाई करण्यासाठी एक बिल्डर देईल. त्याच बरोबर, रशियाच्या बाजूने समतोल साधण्याच्या प्रयत्नात मोठ्या लढाऊ शक्तीचा पुरवठा करण्यास तयार आहे. त्यांना लुहान्स्क आणि डोनेस्तक येथील रशियन समर्थित फुटीरतावादी सैन्यात तैनात केले जातील.