Russia on META: Meta दहशतवादी संघटना घोषित; व्लादिमीर पुतिन यांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 19:19 IST2022-10-11T19:19:06+5:302022-10-11T19:19:25+5:30
मार्क झुकरबर्ग यांची दिग्गज टेक कंपनी मेटाविरोधात रशियाने मोठे पाऊल उचलले आहे.

Russia on META: Meta दहशतवादी संघटना घोषित; व्लादिमीर पुतिन यांची मोठी कारवाई
Russia Action on META: अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मेटा (meta) विरोधात रशियाने मोठे पाऊल उचलले आहे. रशियन सरकारने मार्क झुकरबर्ग यांच्या कंपनीचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. मेटा ही फेसबुकची मूळ कंपनी आहे. फेडरल सर्व्हिस फॉर फायनान्शियल मॉनिटरिंग (रोसफिन मॉनिटरिंग) च्या डेटाबेसनुसार, रशियाने मंगळवारी META ला दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले.
मार्चमध्ये रशियन सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ब्लॉक केले होते. मॉस्कोच्या एका न्यायालयाने मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरेकी क्रियाकलाप केल्याचा आरोप केला होता. मेटा युक्रेनमधील सोशल मीडिया युजर्सना रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कंटेट पोस्ट करण्याची परवानगी देत असल्याचा आरोप केला होता. META च्या वकिलाने नंतर आरोप फेटाळून लावले होते.
विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गला रशियामध्ये प्रवेश करण्यास बंदी असलेल्या 963 प्रमुख अमेरिकन व्यक्तींच्या यादीत सामील करण्यात आले होते. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचाही समावेश आहे. दरम्यान, ही बंदी अशावेळी आली आहे, जेव्हा रशियाने एक दिवस आधी युक्रेनवर 75 क्षेपणास्त्र हल्ले केले. रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर हल्ले करून मोठा विंध्वंस केला.