रशियाकडे ट्रम्प यांची गोपनीय माहिती?
By admin | Published: January 12, 2017 03:48 AM2017-01-12T03:48:44+5:302017-01-12T03:48:44+5:30
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत रशियाकडे गोपनीय माहिती आहे, असे वृत्त आले आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत रशियाकडे गोपनीय माहिती आहे, असे वृत्त आले आहे. पण, ट्रम्प यांनी मात्र, हा ‘मूर्खपणा’ असल्याचे म्हटले आहे. एफबीआय आणि सीआयएसह अमेरिकेतील चार प्रमुख गुप्तचर एजन्सींनी ट्रम्प आणि ओबामा यांच्या समोर गत आठवड्यात एक अहवाल सादर केला. अध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबतचा हा अहवाल असल्याचे सांगितले जाते.
वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिल्यानंतर ट्रम्प यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त खोटे असून पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाने दोन्ही मुख्य उमेदवारांबाबत अडचणी निर्माण होतील, अशी माहिती जमा केली होती. पण, हिलरी क्लिंटन अडचणीत येतील अशीच माहिती समोर आणण्यात आली. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मोहिमेत ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशिया सरकारचे मध्यस्थ यांच्यात माहितीचे आदान प्रदान होत होते. पण, ट्रम्प यांनी ही बनावट सामुग्री असल्याचे म्हटले आहे.