Pakistan: रशियाने पाकिस्तानला हजारो टन मदत पाठविली! सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 10:19 AM2023-03-18T10:19:29+5:302023-03-18T10:19:46+5:30
रशिया हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे रशियाचा गहू कोणताही देश घेत नाहीय. हाच उरलेला गहू रशियाने पाकिस्तानला देऊ केला होता.
आयएमएफ, सौदीसह चीननेही मदतीसाठी हात पसरणाऱ्या पाकिस्तानला हाकलून दिले आहे. दहशतवादाला पोसल्याने पाकिस्तान बर्बाद झाला आहे. आज तेथील जनता दाण्या दाण्यासाठी तरसत आहे. असे असताना रशियाने मदतीसाठी पाठविलेला हजारो टन गहू देखील या पाकिस्तानींनी हडप केला आहे. आता हा गहू गेला कुठे, याची चौकशी सुरु झाली असून ६७ अधिकाऱ्यांना सस्पेंड करून टाकण्यात आले आहे.
रशिया हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे रशियाचा गहू कोणताही देश घेत नाहीय. हाच उरलेला गहू रशियाने पाकिस्तानला देऊ केला होता. पाकिस्तानलाही गरज होती. ज्या दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याच दिवशी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान हे रशियात मदतीसाठी दाखल झाले होते. यानंतर रशियाने मदत सुरु केली होती.
आता तब्बल ४० हजार टन रशियन गहू पाकिस्तानातील गरजूंना मिळालाच नाही, तो चोरी झाला आहे. यामुळे आजवर अब्जावधींचा खजिना, परकीय मदत दहशतवाद्यांवर, भारताविरोधात उधळणाऱ्या पाकिस्तानी सरकारला हादरा बसला आहे. सरकारने तडकाफडकी ६७ अधिकाऱ्यांना निलंबित करून कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. कोणाच्या इशाऱ्यावर एवढा गहू चोरीला गेला, याचे उत्तर या अधिकाऱ्यांकडून मागितले गेले आहे.
सिंध प्रांतातील 10 जिल्ह्यांमध्ये असलेल्या सरकारी गोदामांमधून सुमारे 40,392 टन गहू चोरीला गेला आहे. रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला 50,000 टन गव्हाचा पुरवठा केला होता. पाकिस्तानमध्ये अन्नाअभावी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, अनेक लोक उपासमारीत आहेत. अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी गहू पळविल्याने खळबळ उडाली आहे.