खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:25 PM2023-03-04T17:25:33+5:302023-03-04T17:31:38+5:30
रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली.
रशियन शास्त्रज्ञाचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली. गुरुवारी (2 मार्च) त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बोटीकोव हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि त्यांना लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. अहवालानुसार, 2020 मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव एक होते.
रशियन वृत्तसंस्थेने TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, 47 वर्षीय बोटीकोव, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते, गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्याबद्दल 2021 मध्ये वायरोलॉजिस्टला 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्काराने सन्मानित केले.
बेल्टने दाबला गळा
रशियन शास्त्रज्ञ बोटीकोव यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 29 वर्षीय तरुणाने किरकोळ वादात बोटीकोवचा बेल्टने गळा दाबून खून केला आणि तो पळून गेला. कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांनी याला देशांतर्गत गुन्हा म्हटले आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, बोटीकोवचा मृतदेह सापडल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन शास्त्रज्ञाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात खटला भरण्यात आला असून तो अनेक वर्षांपासून तुरुंगात होता. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"