Russia-Ukraine War: जगाला अंधारात ठेवले! रशियन युद्धनौकांनी अचानक दिशा बदलली; युक्रेनजवळच्या काळ्या समुद्रात पोहोचल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:17 PM2022-02-08T22:17:57+5:302022-02-08T22:18:25+5:30
Russian Warships came in Black Sea: तीन युद्धनौकांवर असलेली युद्धसामुग्री काही क्षणांत संपूर्ण युक्रेन नेस्तनाभूत करू शकते. रशियाची सर्वाधिक शक्तिशाली विनाशिका सोमवारीच भूमध्य सागराकडे रवाना झाली आहे.
युक्रेनसोबतचा रशियाचा तणाव काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. रशियाने १५ दिवासांची शस्त्रसंधी करताना हीच मुदत असेल असे नाटोला सांगितले आहे. तिकडे अमेरिकेलाही युद्धाची खुमखुमी आहे. अशातच रशियाने खूपच खतरनाक चाल खेळली आहे. दुसऱ्या समुद्रात विनाशिका पाठवत असल्याचे सांगून अचानक त्या काळ्या समुद्रात तैनाक केल्याने खळबळ उडाली आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युद्धाभ्यासाचे कारण सांगत सहा अजस्त्र युद्धनौका भूमध्य समुद्रात पाठवत असल्याचे म्हटले होते. मात्र, अचानक अमेरिकेसह नाटोला अंधारात ठेवून या युद्धनौका युक्रेनच्या जवळ असलेल्या काळ्या समुद्रात जाऊन पोहोचल्याने नाटोच्या गोटात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी थेट अमेरिकेच्या नेतृत्वात असलेल्या नाटोच्या सैन्याशी भिडण्याची तयारी केल्याचे म्हटले जात आहे. नाटोने या आधीच युरोपीय देश, अमेरिकेसह युद्धनौका आणि सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेचे नौदल, इटलीचे तसेच फ्रान्सच्या नौदलाने समुद्र व्यापला आहे. गस्त सुरु असताना देखील रशियाच्या सहा युद्धनौकांचा ताफा काळ्या समुद्रात दाखल झाल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. रशियाला नाटोला प्रतिकार करतानाच युक्रेनवर देखील दबाव वाढवावा लागणार आहे.
रशियन नौदलाच्या या युद्धनौका नाटोविरुद्धच्या कारवाईत मोठी भूमिका बजावू शकतात, अशी भीती अनेक संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सहापैकी पाच 775 रोपुचा क्लास एम्फीबियस युद्धनौका आहेत. तर एक प्रोजेक्ट 11711 इवान ग्रेन क्लास लँडिंग शिप आहे. महत्वाची बाब म्हणजे वातावरण खराब असून देखील या युद्धनौका वेळेच्या आधीच काळ्या समुद्रात तैनात झाल्या आहेत. तीन ३१ जानेवारी आणि २ जानेवारीला आणखी तीन युद्धनौका पाठविण्यात आल्या होत्या. एम्फीबियस युद्धनौका या समुद्र किनाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उथळ पाण्यात त्या आरामात जाऊ शकतात. तसेच या युद्धानौकांवर मोठ्या प्रमाणावर सैनिक, रणगाडे, युद्धसामुग्री आणि वाहने वाहून नेता येतात.
त्याहून खतरनाक म्हणजे रशियाची सर्वाधिक शक्तिशाली विनाशिका सोमवारीच भूमध्य सागराकडे रवाना झाली आहे. क्रूजर मार्शल उस्तीनोव भूमध्य समुद्रात जात आहे. या ठिकाणी आधीपासूनच स्लाव क्लासच्या दोन क्रूझर तैनात आहेत. या युद्धनौका शीघ्र हल्ल्यांसाठी ताकदवर समजल्या जातात. या तीन युद्धनौकांवर असलेली युद्धसामुग्री काही क्षणांत संपूर्ण युक्रेन नेस्तनाभूत करू शकते. तसेच विध्वंसक युद्धनौका देखील गस्तीवर पाठविण्यात आल्या आहेत.