Russia Ukraine Conflict: युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज! गोळीबारात सैनिकाचा मृत्यू; गृह युद्धाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 04:44 PM2022-02-19T16:44:54+5:302022-02-19T16:45:13+5:30
Russia Ukraine Conflict: रशिया समर्थित बंडखोर गटांनी लुगांस्क पीपल्स रिपब्लिक आणि डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक या बंडखोर गटांनी आता लष्कराला एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत.
युक्रेनमध्ये गेल्या काही तासांपासून स्फोटांचे आवाज येऊ लागले असून, गोळीबारात एका सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तणाव आणखी वाढला आहे. युक्रेनच्या लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, डॉनबास परिसरात लढाई सुरू आहे.
रशिया समर्थित बंडखोर गटांनी लुगांस्क पीपल्स रिपब्लिक आणि डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक या बंडखोर गटांनी आता लष्कराला एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे युक्रेनध्ये ग्रृहयुद्ध भडकले आहे. याआधी या बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात रशियन समर्थक लोकांना त्यांच्या भागातून रशियाच्या हद्दीत आणले होते. या बंडखोरांनी 18 ते 55 वयोगटातील लोकांना त्यांच्या परिसरात बाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष कधीही आमच्या भूभागावर हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या आपल्या एका हवाई तळावर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने तैनात केल्याचे उपग्रहाने टिपलेल्या फोटोंतून समोर आले आहे. डोनेस्तक प्रदेशातील रशियन-समर्थित फुटीरतावादी सरकारचे प्रमुख डेनिस पुशिलिन यांनी शनिवारी एक निवेदन जारी करून संपूर्ण लष्करी जमावची घोषणा केली आणि राखीव दलाच्या सदस्यांना लष्करी नोंदणी कार्यालयात येण्याचे आवाहन केले. युक्रेनचे सैन्य आणि रशियन समर्थित बंडखोर यांच्यात हिंसाचार सुरू झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील फुटीरतावादी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महिला, मुले आणि वृद्धांना शेजारच्या रशियात पाठवण्याची घोषणा केली. या प्रयत्नांनंतर लगेचच बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात अनेक स्फोट झाले. पूर्व युक्रेनमध्ये 2014 मध्ये फुटीरतावादी संघर्ष सुरू झाला आणि 14,000 हून अधिक लोक मारले गेले.