'हल्ला केल्यास युक्रेनला पाठिंबा', अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 02:30 PM2022-02-19T14:30:35+5:302022-02-19T14:31:27+5:30
Russia Ukraine Conflict : रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) म्हटले आहे.
वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. दरम्यान, युक्रेनला पाठिंबा देणारे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देश रशियाशी चर्चेतून तोडगा काढण्याची चर्चा करत आहेत. दरम्यान, अमेरिकेने रशियाला इशारा दिला आहे. रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकापाठोपाठ एक असे ट्विट करत रशियाला इशारा दिला आहे. "आम्हाला संघर्ष नको आहे, परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची कारणे देखील समर्थनीय असू शकत नाहीत. यानंतरही जर रशियाने आपल्या योजनांवर ठाम राहिल्यास, ते विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी जबाबदार असेल", असे जो बायडेन यांनी म्हटले आहे.
'युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न'
रशिया युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. हा युद्धबंदी नियमांचे उल्लंघन आहे. रशिया याआधीही असे खेळ खेळत आला आहे. युनायटेड स्टेट्स आणि आमचे मित्र राष्ट्र युक्रेनच्या लोकांना पाठिंबा देत राहतील. आम्ही रशियाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरु. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादू शकतील, अशी तयारी केली आहे, असे ट्विट करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एकप्रकारे रशियाला इशारा दिला आहे.
चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न
जो बायडेन म्हणाले, रशिया-युक्रेन वादावर चर्चेतून वाद मिटवता येईल. आताही उशीर झालेला नाही. रशिया अजूनही राजनैतिक मार्गाने या समस्येवर उपाय काढू शकतो. बायडेन म्हणाले की, दक्षिणेतील रशियन सैन्य अजूनही काळ्या समुद्राजवळ बेलारूसमध्ये तैनात आहे. त्यांनी युक्रेनला वेढा घातला आहे. रशियाचे सैन्य येत्या काही दिवसांत युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार करत आहे.
'युक्रेनला पॅकेज देण्यात येईल'
दरम्यान, व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र युक्रेनला पॅकेज देण्यावर विचार करत आहेत. सायबर स्पेसमध्ये रशिया अत्यंत आक्रमक पावले उचलत आहे. यासाठी वॉशिंग्टन रशियाला उत्तर देण्याची तयारी निश्चित करत आहे.