Russia Ukraine Crisis: यूक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा ‘सीक्रेट प्लॅन’ लीक; ३ टप्प्यात हल्ला, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 10:20 PM2022-02-05T22:20:15+5:302022-02-05T22:20:33+5:30
जर्मन मीडिया रिपोर्टनुसार, यूक्रेनवर रशियन हल्ल्याच्या योजनेचा खळबळजनक दावा केला आहे
मॉस्को – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यूक्रेनबाबत कुठल्याही दबावाला झुकण्यास तयार नाहीत. दुसरीकडे यूक्रेनमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात नाटो संघानं तैनात केलेल्या सैन्याची संख्या वाढवली आहे. रशियाच्या चहुबाजूने नाटो समर्थित देशांचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. त्यानंतर रशियानं आमच्या ताकदीला आव्हान न देण्याचा इशारा दिला आहे.
त्याच दरम्यान, जर्मन मीडिया रिपोर्टनुसार, यूक्रेनवर रशियन हल्ल्याच्या योजनेचा खळबळजनक दावा केला आहे. यूक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा प्लॅन पूर्ण तयार आहे. यूक्रेनला रशिया समर्थित देश बनवण्यापासून रशियन धोरणाचं सरकार आखण्याबाबतचा उल्लेख आहे. एका परदेशी सीक्रेट सर्व्हिसच्या हवाल्याने हा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ३ टप्प्यातील योजनेचा आराखडा सांगण्यात आला आहे. या हल्ल्याचं नेतृत्व मॉस्कोच्या हातात आहे. बिल्डच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्याचा महत्त्वाचा टप्पा तिसरा आहे. त्यात यूक्रेनमध्ये रशियन समर्पित सरकार स्थापन झाल्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड करुन त्यांना नजरकैदेत ठेवलं जाणार आहे.
टप्पा १ आणि २ मध्ये यूक्रेनवर रशिया कब्जा करणार
या प्लॅननुसार, स्टेज १ मध्ये यूक्रेनवर रशियाचा हल्ला आणि स्टेज २ मध्ये मॉस्कोच्या नियंत्रणानंतर यूक्रेनमध्ये नवीन संसदेची स्थापना करुन विरोधकांना दाबण्याचा डाव आहे. बिल्डचा हा रिपोर्ट गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने देण्यात आला आहे. सध्या यूक्रेनवर रशियाचा पूर्ण ताकदीनं हल्ल्याचं सर्वात मोठा धोका आहे. इतकचं नाही तर पुतीन त्यांचा प्लॅन कधीही बदलत नाहीत. त्यामुळे यूक्रेनवरील रशियाचा हल्ला फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यूक्रेनच्या प्रमुख शहरांना घेराव
बिल्डच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, स्टेज १ मध्ये यूक्रेनला रशियन सैन्याकडून घेरलं जाईल. या काळात यूक्रेन सैन्याचा सामना केल्यावर प्रमुख शहरांना घेराव घातला जाईल. रशियन गुप्तचर सेवा आणि पुतीन यांचे प्रामाणिक नेते याआधीच यूक्रेनमध्ये सक्रीय होतील. ते रशियन समर्थक शहरांवर सत्ता स्थापन करतील. त्यानंतर बंडखोरांना आत्मसमर्पण करण्यासाठी दबाव वाढवला जाईल.
यूक्रेनची संसद भंग करुन रशियन सरकारची स्थापना
एकदा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यात यूक्रेन रशियन समर्थक सरकार स्थापन करेल. पीपुल्स राडा नावाची संसद यूक्रेनच्या संसदेला निरर्थक घोषित करेल. त्यानंतर रशियन समर्थक नेत्यांना सत्ता दिली जाईल. रशियन गुप्तचर यंत्रणेद्वारे या नेत्यांची निवड आधीच केली आहे. परंतु पीपुल्स राडा ही तात्पुरतं सरकार राहील. अखेरीस एक नव्या सरकारची स्थापना केली जाईल.