Russia-Ukraine Dispute: 'युक्रेनवर हल्ला केल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल', जो बिडेन यांचा व्लादिमीर पुतिन यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:32 AM2022-02-13T08:32:12+5:302022-02-13T08:35:38+5:30
Russia-Ukraine Dispute: यूक्रेन संकटाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात फोनवर 62 मिनीटे चर्चा झाली.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी शनिवारी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनच्या सीमेवरुन सैनिकांना हटवण्यास सांगितले आहे. तसेच, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्र रशियाला जोरदार प्रत्युत्तर देतील आणि त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने ही माहिती दिली.
मोठा परिणाम भोगावा लागेल
मिळालेल्या माहितीनुसार, जो बिडेन व्लादिमीर पुतीन यांना म्हणाले की, युक्रेनवर हल्ला केल्यास याचा मानव जातीवर मोठा परिणाम होईल. तसेच या हल्ल्यामुळे जगभरात रशियाची प्रतिमा मलीन होईल. युक्रेन विषयावर दोघांमध्ये 62 मिनिटे फोनवर चर्चा झाली. बिडेनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने गुप्तचर माहितीचा हवाला देत सांगितले की, रशिया काही दिवसांतच म्हणजेच बीजिंगमध्ये चालू असलेल्या शीत ऑलिम्पिकपूर्वीच(20 फेब्रुवारी) हल्ला करू शकतो.
President Biden was clear with President Putin that the US remains prepared to engage in diplomacy, but is equally prepared for other scenarios. If Russia undertakes a further invasion of Ukraine, the US along with its allies, partners will impose swift & severe costs on Russia pic.twitter.com/VV7RJx7gG7
— ANI (@ANI) February 12, 2022
रशियाने तैनात केले सैन्य
विशेष म्हणजे रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक सैनिक जमा केले असून शेजारील बेलारुसमध्ये सरावासाठी आपले सैन्य पाठवले आहे. मात्र, आपण युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचा रशियाने सातत्याने इन्कार केला आहे. यातच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पोलंडमध्ये 3000 अतिरिक्त अमेरिकन सैनिक पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व गोष्टीवरुन अमेरिका आणि रशिया कुठल्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.
काळ्या समुद्रात सैन्य तैनात
बिडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आवाहन केले आहे. रशियन हल्ल्यानंतर हवाई सेवा किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यास अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन सैन्य त्यांना बाहेर काढण्याची अपेक्षा करू नये, असा आग्रह त्यांनी धरला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका रोमानियाच्या कॉन्स्टँटा येथील काळ्या समुद्रातील बंदरावर लष्करी साहित्य आणि वाढीव सैन्य तैनात करत आहे.