Ukraine War: रशियावर लादले गेले कठोर निर्बंध, फायदा उचलण्याच्या तयारीत भारत; घेणार मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:13 PM2022-03-14T17:13:00+5:302022-03-14T17:14:36+5:30
भारत आपल्या आवश्यकतेच्या 80 टक्के तेल आयात करतो. यांपैकी आतापर्यंत केवळ 2 ते 3 टक्के खरेदीच रशियाकडून होत होती.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर (Ukraine Russia War) अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत रशिया आपले कच्चे तेल आणि इतर वस्तू जगाला विकण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाने आपला मित्र देश भारताशी संपर्क साधला आहे.
यासंदर्भात, सरकार रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा विचार करत आहे. एवढेच नाही, तर या वस्तूंची डील रुपया-रुबलमध्ये करण्यासंदर्भातही रशियाने भाष्य केले असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भारत आपल्या आवश्यकतेच्या 80 टक्के तेल आयात करतो. यांपैकी आतापर्यंत केवळ 2 ते 3 टक्के खरेदीच रशियाकडून होत होती. मात्र, युक्रेन संकटामुळे एकीकडे जगात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, तर दुसरीकडे रशियाला आपले कच्चे तेल स्वस्तात विकावे लागत आहे. युक्रेन संकटामुळे आपल्याला कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींचा अथवा महागाईचा फटका बसू नये, अशी भारत सरकारची इच्छा आहे. या रणनीतीचा भाग म्हणून भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याची योजना आखत आहे. यामुळे सरकारला महागाईच्या काळात तेलावरील खर्च मर्यादित ठेवण्यास मदत होईल.
भारत सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'रशियाकडून तेल आणि इतरही काही वस्तूं मोठ्या डिस्काउंटमध्ये ऑफर केल्या जात आहेत. या वस्तू खरेदी करणअयात आपल्याला कसल्याही प्रकारची समस्या नाही. मात्र टँकर आणि विमा संरक्षणासह अनेक वस्तूंवर लक्ष द्यावे लागेल. एकदा का ही समस्या सुटली म्हणजे, आम्ही खरेदीसंदर्भात पुढचे पाऊल टाकू.'
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादल्यानंतर, जगातील अनेक देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र या निर्बंधांचा आयातीवर परिणाम होणार नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या रुपया-रुबलमधील व्यापाराची यंत्रणा तयार केली जात आहे.