रशिया इतर देशांमध्ये तैनात करणार अण्वस्त्रे; पुतीन यांची माहिती, अमेरिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:27 AM2023-03-27T11:27:34+5:302023-03-27T11:30:01+5:30
युक्रेनला खराब झालेल्या युरेनियमचा दारूगोळा पुरवण्याच्या ब्रिटनच्या योजनेला हे प्रत्युत्तर असल्याचे पुतीन यांनी स्वत: म्हटले आहे.
मॉस्को : रशिया रणनीतीचा भाग म्हणून शेजारील देश बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी केली. युक्रेनमध्ये लष्करी सहकार्य वाढवत असलेल्या पाश्चात्य देशांना दिलेला इशारा म्हणून त्यांच्या या घोषणेकडे पाहिले जात आहे.
युक्रेनला खराब झालेल्या युरेनियमचा दारूगोळा पुरवण्याच्या ब्रिटनच्या योजनेला हे प्रत्युत्तर असल्याचे पुतीन यांनी स्वत: म्हटले आहे. हा दारूगोळा अण्वस्त्रयुक्त आहे, असा दावा पुतीन यांनी यापूर्वी केला होता. तथापि, नंतर त्यांनी आपला स्वर मृदू केला. परंतु त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही शस्त्रे युक्रेनमधील सैन्य दल व नागरिकांसाठी धाेकादायक आहेत. बेलारूस हे ‘नाटो’ देशांनी वेढले गेले आहे. त्यामुळे बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को हे या शस्त्रास्त्रांची अनेक दिवसांपासून मागणी करत असल्याचे पुतीन म्हणाले.
पुतीन यांचे माजी भाषण लेखक मोस्ट वॉण्टेड घोषित
रशियन पोलिसांनी २००८ ते २०१२ दरम्यान पुतीन यांचे भाषण लिहिणारे अब्बास गालिमोव्ह यांना ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले आहे. युक्रेन युद्धावरून रशियावर टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अब्बास यांचे नाव गृह मंत्रालयाच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ लोकांच्या यादीत टाकण्यात आले आहे.