रशियन नेते एलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच मृत्यू, होते पुतिन यांचे कट्टर विरोधक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 06:09 PM2024-02-16T18:09:56+5:302024-02-16T18:10:28+5:30
ते बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होते. यामालो-नेनेट्स तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी (Alexei Navalny) यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ते बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होते. यामालो-नेनेट्स तुरुंगात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, यामालो-नेनेट्स स्वायत्त जिल्हा प्रशासनाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नवलनी शुक्रवारी तुरुंगात फिरले. मात्र यानंतर त्यांची प्रकृती खालावली. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली होती. यानंतर ते बेशुद्ध झाले. यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र ते शुद्धीवर येऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
एलेक्स यांच्यासंदर्भात अनेक वेळा अफवा आल्या आहेत. यापूर्वी, ते गायब झाल्याची, तसेच त्यांना कारागृहात विष देण्यात आल्याची अफवा देखील आली होती.
'भावी नेता म्हणून बघत होते समर्थक -
नवलनी यांचे समर्थक त्यांच्याकडे भावी नेता म्हणून बघतात. एवढेच नाही, तर ते तुरुंगातून सुटतील आणि देशाचे नेतृत्व करतील, असेही त्यांचे समर्थक म्हणतात. मात्र, नवलनी यांना रशियात किती समर्थन आहे, हे स्पष्ट नाही. याशिवाय, अधिकारी नवलनी आणि त्यांच्या समर्थकांकडे, सीआयए गुप्तचर संस्थेशी संबंधित फुटिरतावादी म्हणून पाहतात. एवढेच नाही, तर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना रशिया अस्थिर करायचा आहे. सरकारने त्यांचे आंदोलन बेकायदेशीर घोषित केले असून, त्यांच्या अनेक समर्थकांवर परदेशात पळून जाण्याची वेळ आली आहे.