बॉम्बमुळे रशियन विमान कोसळले? इसिसचा दावा खरा?
By admin | Published: November 6, 2015 12:56 AM2015-11-06T00:56:39+5:302015-11-06T00:56:39+5:30
बॉम्बस्फोटामुळे रशियन विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज ब्रिटन आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा निष्कर्ष
लंडन : बॉम्बस्फोटामुळे रशियन विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज ब्रिटन आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे हे विमान आपण पाडल्याचा ‘इसिस’चा दावा खरा ठरण्याची शक्यता आहे.
हे विमान शरम-अल-शेख येथून उड्डाण करताच २३ मिनिटांनी ते सिनाई येथे कोसळले होते. या अपघातात विमानातील सर्व २२४ जण मरण पावले होते. त्यानंतर काही तासातच हे विमान आपण पाडल्याचा दावा ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेने केला होता.
या घटनेनंतर ब्रिटनने इजिप्तच्या सिनाई या बेटावरील आपली विमानसेवा बेमुदत थांबविली आहे. या विमानात ‘इसिस’शी निगडित एका गटाने स्फोटके पेरली होती, असे काही अतिरेकी गटांच्या प्राथमिक संवादावरून सूचित होते, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले. मात्र याबाबत सीआयए आणि अन्य दुसऱ्या गुप्तचर संस्थांनी ठोस निष्कर्ष काढलेला नाही. दुर्घटनास्थळी सापडलेला ब्लॅकबॉक्स आणि अन्य फॉरेन्सिक दुराव्यांचे विश्लेषण करण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत ठोसपणे काही सांगता येत नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
मात्र असा घातपात करण्याबाबत सिरियास्थित ‘इसिस’च्या गटांतर्फे कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नव्हता.
हा अपघात बॉम्बमुळे झाला असला तरी सिनाईस्थित ‘इसिस’च्या गटाने आपल्या स्तरावरच हा कट रचला, असे म्हणावे लागेल, असेही हा अधिकारी म्हणाला. अतिरेकी गटांचे संवाद बऱ्याच वेळा दिशाभूल करणारे असतात. हे विमान बॉम्बस्फोटामुळे कोसळले की अन्य कशामुळे हे तपास पूर्ण झाल्यानंतरच कळेल, असे दुसऱ्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रिटनचे विदेश उपमंत्री फिलीप हेमंड म्हणाले की, बॉम्बस्फोटामुळे कदाचित हे विमान कोसळले असावे. त्यामुळे शरम-अल-शेख आणि सिनाई रिसॉट येथे ब्रिटनमधून जाणाऱ्या विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. ब्रिटिश सरकारच्या ‘कोबरा’ या आपत्कालीन समितीच्या बैठकीनंतर हेमंड बोलत होते. सुट्या घालविण्यासाठी शरम-अल-शेख येथे जाऊ नका, असा सल्ला ब्रिटिश नागरिकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ब्रिटनमधून हजारो लोक दरवर्षी या बेटावर पर्यटनासाठी जात असतात.
या विमानातील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाल्याचे रशियन आणि इजिप्तच्या तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले होते. फ्लाईट डेटा रेकॉर्डमधील माहिती तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. हे विमान कोसळण्यापूर्वी अमेरिकी उपग्रहाने तेथील छायाचित्रे टिपली आहेत. त्यावरून तेथे मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्याचे सूचित होते. ही उष्णता बॉम्बस्फोटाने किंवा इंजिनात स्फोट झाल्याने निर्माण होऊ शकते, असे अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर एक अधिकारी म्हणाला की, विमानावर क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता कमी आहे. कारण क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचे किंवा इंजिन जळाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. (वृत्तसंस्था)
बॉम्बमुळे विमान कोसळल्याचा पुरावा नाही : इजिप्त
कैरो : कदाचित बॉम्बस्फोट होऊन रशियाचे विमान कोसळले असावे, असा अमेरिका आणि ब्रिटन यांनी वर्तविलेला अंदाज इजिप्तचे नागरी उड्डयनमंत्री होसम कमाल यांनी फेटाळून लावला आहे.
येथे जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, हे विमान बॉम्बस्फोट घडवून उडविण्यात आल्याचा कोणताही दुरावा अद्याप हाती लागलेला नाही. अमेरिका-ब्रिटन यांचा याबाबतचा युक्तिवाद वस्तुस्थितीला धरून नाही. इजिप्तमध्ये सर्व विमानतळांवर सुरक्षाविषयक सर्व मापदंडाची अंमलबजावणी केली जाते.