इसिसने पाडले रशियन विमान!
By admin | Published: November 1, 2015 03:36 AM2015-11-01T03:36:01+5:302015-11-01T03:36:01+5:30
दोनशेहून जास्त पर्यटकांना घेऊन जात असलेले रशियन विमान शनिवारी इजिप्तच्या सिनाई बेटावरील डोंगराळ भागात कोसळले. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरियाच्या (इसिस) इजिप्तमधील
- इजिप्तच्या सिनाई बेटावर कोसळले
कैरो : दोनशेहून जास्त पर्यटकांना घेऊन जात असलेले रशियन विमान शनिवारी इजिप्तच्या सिनाई बेटावरील डोंगराळ भागात कोसळले. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरियाच्या (इसिस) इजिप्तमधील गटाने आपणच रशियन विमान सिनाईमध्ये पाडल्याचा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त विमानातील १०० प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. या विमानात २१७ प्रवासी आणि सात कर्मचारी असे २२४ जण होते. प्रवाशांत १३८ महिला आणि २ ते १७ वर्षादरम्यानच्या १७ मुलांचा समावेश होता. घटनास्थळी दाखल झालेल्या इजिप्शियन अधिकाऱ्यांनी दुर्घटनेतून एकही प्रवासी बचावला असण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रशियन विमान दुर्घटनाग्रस्त झालेल्या सिनाई बेटावर इसिसशी संलग्न स्थानिक दहशतवादी संघटना सक्रीय आहे. त्यामुळे ही दुर्घटना घात की अपघात अशी शंकेची पाल प्रारंभी चुकचुकली होती. परंतु, सुरक्षा अधिकारी व प्रशासनाला असे कोणतेही संकेत न दिसल्याने सर्वजण याला एक अपघातच मानत होते. मात्र, सिनाई बेटावरील दहशतवादी गटाने आपणच हे विमान पाडल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. विमान दुर्घटनेमागील कारणाचा अद्याप अधिकृतपणे उलगडा व्हायचा असला, तरी सुरक्षा व उड्डयन अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्राथमिक आढाव्यातून दुर्घटना तांत्रिक कारणामुळे घडल्याचे प्राथमिक संकेत होते. पंतप्रधान इस्माईल यांनी मंत्रिमंडळ स्तरावरील आपत्ती निवारण समिती स्थापन करून तातडीने समितीची बैठक घेतली. सुरक्षा दलाच्या विमानांनी दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष हुडकून काढले असून, ४५ रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत, असे मंत्रिमंडळाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह रशियन दूतावासाकडे रवाना करण्यात येणार असून, तेथून ते रशियाला पाठविले जातील.
बहुतांश मृतदेह जळालेले : घटनास्थळी बचावकार्य करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १०० मृतदेह हाती लागले असून त्यातील बहुतांश जळालेले आहेत. विमानातील प्रवाशांपैकी बहुतांश पर्यटक होते. विमानाने आज सकाळी प्रसिद्ध पर्यटनस्थळ शर्म अल-शेख रिसॉर्ट येथून सेंट पीटर्सबर्गसाठी उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाचा संपर्क तुटला होता. रशियन विमान सिनाई बेटावर दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या वृत्ताला इजिप्तचे पंतप्रधान शरीफ इस्माईल यांच्या कार्यालयाने दुजोरा दिला.
घटनास्थळी भयंकर दृश्य : इजिप्तच्या हसाना भागात विमानाचे अवशेष आढळले. विमानाचे दोन तुकडे झाले होते. त्यातील एक तुकडा जळत होता तर दुसरा खडकावर होता. घटनास्थळीचे द्दृष्य भयंकर होते. जिकडे तिकडे मृतदेह आणि त्यांचे अवशेष विखुरलेले होते. विमानातील अनेक प्रवाशांचे मृतदेह सिटबेल्ट बांधलेल्या अवस्थेत पाहून काळीज गोठून गेले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विमानाचा ब्लॅकबॉक्सही सापडला असून त्यामुळे दुर्घटनेच्या कारणांवर अधिक प्रकाश पडू शकेल.
विमान कंपनीविषयी : हे दुर्दैवी विमान पश्चिम सायबेरियातील कोग्लीमाव्हिया या छोट्या विमान कंपनीचे होते. १९९३ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी २०१२ पासून मेट्रोजेट या ब्रॅण्डनेमखाली व्यवसाय करत आहे. कंपनीकडे नऊ विमाने आहेत. ही कंपनी २०१३ सालापर्यंत देशांतर्गत उड्डाणेच करत होती. मात्र, २०१३ मध्ये एका पर्यटन कंपनीने सूत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीने देशाबाहेरील उड्डाणे सुरू केली.
विमानाच्या इंजिनबाबत अनेकदा तक्रारी : विमानाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाच्या इंजिनमधील समस्यांबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. विमानाचे इंजिन सुरू व्हायचे नाही, त्यामुळे गेल्या आठवड्यात अनेकवेळा तांत्रिक विभागाचे सहकार्य मागण्यात आले होते, असा खुलासा सूत्रांनी केला. त्या आधारे विमान कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुखवटा :विमान दुर्घटनेतील प्राणहानीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी रविवारी देशभर दुखवटा पाळण्यात येईल, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली. त्यांनी पंतप्रधान दिमीत्री मेदवेदेव यांना दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले. त्यानंतर वाहतूकमंत्री माकसिम सोकोलोव्ह यांच्या नेतृत्वाखालील चौकशी पथक दुपारीच इजिप्तला रवाना झाले.