आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, बंड चिरडून टाकू; रशियातील गृहयुद्धावर पुतिन संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:33 PM2023-06-24T13:33:18+5:302023-06-24T13:33:59+5:30
रशियन संरक्षण मंत्रालय आणखी एकदा वॅनगर आर्मीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. वॅनगर आर्मी जे काही पाऊल उचलतेय ते देशाच्याविरोधात आहे.
रशिया भविष्यासाठी कठीण संघर्ष करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला कमकुवत करतायेत त्या सर्व सोडायला हव्या. रशियाच्या भाग्याचा निर्णय आता केला जातोय. आपल्याला सर्व ताकदी आणि कुठलेही मतभेद दूर करण्याची आवश्यकता आहे असं रशियात गृहयुद्ध अधिक तीव्र होत असून या संकटातच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधले आहे.
पुतिन म्हणाले की, आज आपण ज्याचा सामना करतोय तो अंतर्गत विश्वासघात आहे. आपल्याला रशियाच्या सर्व सैन्यांची एकता गरजेची आहे. जो कुणी विद्रोहाचे पाऊल उचलेल त्याला दंड द्यायला हवा. त्याला कायदा आणि आमच्या लोकांना उत्तर द्यावे लागेल. आता आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांना शिक्षा भोगावी लागेल. रशियातील लोकांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यायला हवे असं त्यांनी सांगितले. तसेच या सशस्त्र विद्रोहाला आमचेही कठोर उत्तर असेल. खासगी हितासाठी देशासोबत विश्वासघात झालाय आम्ही आमच्या देशाचे आणि लोकांचे रक्षण करू असंही पुतिन यांनी स्पष्ट केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन वॅनगर प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या सशस्त्र सत्तापालटाच्या हालचालींवर नियमित देखरेख ठेवत आहेत. पुतिन यांनी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि नॅशनल गार्डशी संपर्क ठेवला आहे. रशियातील संसदेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे वॅनगर आर्मीने रशियातील आणखी एक शहर वोरोनिश यावर सैन्यासह ताबा घेतल्याचा दावा केला आहे. CNN रिपोर्टनुसार, वॅनगर सैन्याने रशियाचे ३ हेलिकॉप्टरही पाडले आहे. रशियाने मॉस्कोतील या कारवाईला दहशतवादी विरोधी ऑपरेशन घोषणा केली आहे. रशियन सैन्य वॅनगर आर्मीचा सामना करण्यासाठी पुढे सरसावले आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्रालय आणखी एकदा वॅनगर आर्मीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. वॅनगर आर्मी जे काही पाऊल उचलतेय ते देशाच्याविरोधात आहे. देशाविरोधात त्यांना भडकावले जातेय. देशाविरोधी या कृत्यात सहभागी होऊ नका. वॅनगर प्रतिनिधींनी कायद्याचे पालन करावे. आम्ही तुमच्या सुरक्षेची ग्वाही देतो असं रशियाचे संरक्षण मंत्रालय वॅनगर आर्मीला समजवण्याचा प्रयत्न करतायेत.