अख्खं जग ज्यांना वचकून आहे, ते व्लादिमीर पुतिन त्यांच्याच मुलींना ‘घाबरुन’ आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:45 AM2022-04-26T05:45:37+5:302022-04-26T05:46:18+5:30
पुतिन यांच्या ‘मुली’च त्यांच्या कट्टर विरोधक! त्यांची स्वत:ची सख्खी मुलगी डॉ. मारिया वोरन्तसोवा आणि मानलेली मुलगी सेनिया या दोघीही पुतिन यांच्या सरळसरळ विरोधात गेल्या आहेत
पुतिन यांनी जेव्हापासून रशियाची सत्ता ‘ताब्यात’ घेतली, तेव्हापासूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी ‘गूढ’ आहे. मुळात ‘गुप्तहेर’ असलेला पुतिन हा माणूसच अगदी रहस्यमय आहे. आपण काय करतोय, याची खबर या कानाची त्या कानाला लागू नये, इतकी दक्षता ते घेतात. त्यामुळे स्त्रियांशी असलेली त्यांची सलगी, प्रेमप्रकरणं त्यांनी फारशी बाहेर येऊ दिली नाहीत. इतकंच काय, त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाविषयी, त्यांच्या मुलींविषयीही कोणाला फारसं काही माहीत नाही. त्याविषयी कोणी; अगदी माध्यमांतली व्यक्तीही काही बोलायला लागली, तर अख्ख्या जगात ती व्यक्ती पुन्हा कधीच कुठे दिसणार नाही, याची उत्तम व्यवस्था ते करतात, अशी त्यांची ख्याती आहे. मध्यंतरी त्यांच्या काही ‘सिक्रेट गर्लफ्रेण्ड्स’ची नावं बाहेर फुटली, पण त्यालाही बराच काळ लागला. शिवाय त्याआधी काही लोक कायमचे ‘गायब’ झाले तेही खरंच...
पुतिन यांच्या माथेफिरुपणामुळे अख्खं जग त्यांना वचकून असलं तरी ते स्वत: मात्र त्यांच्याच मुलींना ‘घाबरुन’ आहेत, हे आश्चर्यजनक असलं तरी नुकतंच बाहेर आलेलं सत्य. त्यांची स्वत:ची सख्खी मुलगी डॉ. मारिया वोरन्तसोवा आणि मानलेली मुलगी सेनिया या दोघीही पुतिन यांच्या सरळसरळ विरोधात गेल्या आहेत. पुतिन यांनी डॉ. मारियाला नुकतीच देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. ती देशाबाहेर गेली तर परत रशियात येणार नाही आणि तिथून ‘गुप्त कारवाया’ करेल, अशी त्यांना भीती आहे. पुतिन यांची पहिली पत्नी लुडमिला यांच्यापासून पुतिन यांना डॉ. मारिया आणि कतेरिना तिखोनोवा या दोन मुली आहेत. तब्बल तीस वर्षं सोबत राहिल्यानंतर पुतिन आणि लुडमिला यांचा २०१३मध्ये घटस्फोट झाला. डॉ. मारिया संशोधक आहे आणि क्रेमलिनमध्ये ती मोठ्या हुद्द्यावर आहे.
पुतिन यांनी आपल्या कुटुंबाला जगापासून ‘लपवून’ ठेवलं असलं तरी त्यांची आणखी एक अतिशय जवळची व्यक्ती मात्र जगापासून कधीच लपून राहिली नाही, ती म्हणजे त्यांची ‘मानलेली’ मुलगी सेनिया सोबचाक (Ksenia Sobchak). सेनिया आत्ता चाळीस वर्षांची आहे, पण ती अगदी लहान असल्यापासून पुतिन तिला ओळखतात. सेनियाचे वडील अनातोली सोबचाक हे सेंट पीटर्सबर्गचे माजी महापौर आणि पुतिन यांचे ‘गुरू’ तसेच ‘बॉस’. ते कायद्याचे प्रोफेसरही होते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे पुतिन नंतर राजकारणात आले. एवढंच नव्हे, त्यांनीच पुतिन यांचं बोट धरुन त्यांना राजकारणाचे धडे दिले. अनातोली हे सेंट पीटर्सबर्गचे महापौर असताना त्यांच्यामुळेच पुतिन उपमहापौर झाले होते.
पुतिन जेव्हा कोणीच नव्हते, तेव्हापासून सेनिया आणि पुतिन एकमेकांना ओळखतात. सेनिया तेव्हा लहान होती. तिच्या वडिलांमुळे पुतिन यांचं त्यांच्या घरी खूप जाणं-येणं होतं. सेनिया ज्यू धर्माशी संबंधित आहे. तिचा नामकरण विधी झाला, त्यावेळी तरुण पुतिनही त्यांच्या घरी उपस्थित होते. काही वर्षांनी सेनियाच्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळीही सेनिया कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होताना पुतिन अंत्यविधीसाठी आवर्जून उपस्थित होते. पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही सेनिया आणि तिच्या कुटुंबियांचे पुतिन यांच्याशी संबंध अतिशय चांगले होते, पण राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पुतिन जसे अधिकाधिक आक्रमक, हेकेखोर होत गेले, आपल्या विरोधकांना संपवू लागले. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांमधले स्नेहाचे संबंध संपले. ज्या सेनियाला पुतिन आपली मुलगी मानत होते, ती सेनियादेखील पुतिन यांच्याविरोधात गेली. त्यांच्या धोरणांवर आणि हडेलहप्पीवर जाहीर टीका करू लागली. एवढंच नाही, २०१८मध्ये पुतिन यांच्याविरुद्ध थेट राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकही तिनं लढवली. या टोकाच्या असमान लढाईत सेनियाचा दारुण पराभव झाला हे खरं, ते अपेक्षितही होतं, पण पुतिन यांना विरोधाचा अतिशय प्रबळ आणि कायदेशीर मार्गाचा वापर तिनं केला.
पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुतिन यांचा सर्वात पहिल्यांदा जाहीर निषेध केला तोही सेनियानंच. पुतिन यांना विरोध करण्यासाठी नाईलाजानं सेनिया राजकारणात आली. ती एक प्रसिद्ध मॉडेल तर आहेच, याशिवाय रशियन टीव्ही चॅनेलवरील ॲन्कर म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. युक्रेनवर हल्ल्याला सेनियानं सर्वस्वी पुतिन यांना जबाबदार धरतानाच देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा त्यांनी कधीच धुळीला मिळवली असल्याची धारदार टीकाही केली. पुतिन एकेकाळी आपल्याला मुलगी मानत असले, तरी आपल्यालाही संपवायला ते कधीच मागे-पुढे पाहाणार नाहीत, हे सेनियालाही माहीत असल्यानं आपल्या मुलासह इस्त्रायलला स्थायिक व्हायचा निर्णय तिनं घेतला.
घर विकून इस्त्रायलमध्ये आसरा!
रशियाची राजधानी मॉस्को येथील अत्यंत उच्चभ्रू अशा वस्तीत सेेनियाचं आलिशान घर होतं. सुमारे एक कोटी डाॅलर्स किमतीचं हे घरही तिनं तातडीनं विकून टाकलं आणि इस्त्रायलमध्ये आसरा घेतला. आता ती इस्त्रायलमध्ये असली तरी पुतिन यांच्यावरील टीकास्त्र मात्र तिनं जराही कमी केलेलं नाही. सेनियाचं स्वत:चं वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. तिनं दोन लग्नंही केली, पण तिचा मुख्य राग आहे तो पुतिन यांच्यावर. स्वत:ला पुतिन यांची मुलगी म्हणवून घेण्याची तिला लाज वाटते.