“भारताला UNSCचे स्थायी सदस्यत्व मिळायला हवे”: राष्ट्राध्यक्ष पुतिन, रशियाचा पूर्ण पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 11:43 PM2023-10-05T23:43:08+5:302023-10-05T23:47:37+5:30

Russia Support India For UNSC Membership: भारत राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून पुढे जात असून, कोणत्याही दबावासमोर न झुकता काम करत आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

russian president vladimir putin support and said india should be a permanent member of unsc | “भारताला UNSCचे स्थायी सदस्यत्व मिळायला हवे”: राष्ट्राध्यक्ष पुतिन, रशियाचा पूर्ण पाठिंबा

“भारताला UNSCचे स्थायी सदस्यत्व मिळायला हवे”: राष्ट्राध्यक्ष पुतिन, रशियाचा पूर्ण पाठिंबा

googlenewsNext

Russia Support India For UNSC Membership: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थानी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र, अद्यापही त्यात यश येताना दिसत नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी चीन विरोध करत आहे. तर काही देशांचे भारताला समर्थन आहे. यात आता रशियाची भर पडली आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळाले पाहिजे, असे महत्त्वाचे विधान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले आहे. 

व्लादिमिर पुतिन यांनी भारताच्या मजबूत आर्थिक विकासाचे मोकळेपणाने कौतुक केले आहे. तर काही देशांवर टीका केली आहे. असे काही देश आहेत, जे असे मानतात की, आपले अंधानुकरण न करणारा देश आपला शत्रू आहे.  एकेकाळी भारतासोबत असाच समज करण्याचा प्रयत्न त्या देशांनी केला होता. मात्र, आम्हाला सर्व गोष्टीची माहिती आहेत. आशियातील परिस्थिती आपण पाहत आहोत आणि अनुभवत आहोत. सर्व काही पूर्णपणे स्पष्ट आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे. 

भारत आता कुणासमोरही न झुकता काम करतोय

भारतीय नेतृत्व हे स्व-निर्देशित आहे. म्हणजेच ते कोणत्याही दबावाशिवाय आणि झुकतेशिवाय काम करत आहे. भारतीय नेतृत्व राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून पुढे जात आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांच्या प्रयत्नांना आता काही अर्थ राहिलेला नाही. पण तरीही ते दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. असे देश अरब देशांनाही शत्रू मानून तसेच वर्तन करत आहेत, असे पुतिन यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुद्धिमान नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासात चांगली प्रगती करत आहे, असे गौरवोद्गार पुतिन यांनी काढले होते.

भारत आत्तापर्यंत ८ वेळा या संघटनेचा अस्थायी सदस्य

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या संस्थेचे सदस्यत्व दोन प्रकारचे आहे. एक स्थायी आणि दुसरे अस्थायी. अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन हे पाच देश या संघटनेचे कायमस्वरुपी सदस्य आहेत. याशिवाय १० देश असे आहेत, जे दरवर्षी बदलतात. सगळी शक्ती या पाच स्थायी सदस्य देशांकडे एकवटलेली आहे. कोणत्या देशांना आमंत्रण द्यायचे याचा निर्णय हे पाच देश घेतात. भारत आत्तापर्यंत ८ वेळा या संघटनेचा अस्थायी सदस्य होता. या संघटनेच्या कायमस्वरुपी सदस्यांची संख्या वाढायला हवी, यावर भारत जोर देत आहे. मात्र, चीन भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी तयार नाही.  

दरम्यान, भारत या संघटनेमध्ये आपल्यासोबत जपानला घेऊ इच्छित आहे. पण चीन आणि जपानचे संबंध चांगले नसल्याने चीनचा या गोष्टीला विरोध आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः सांगितले की, भारत लवकरच सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनू शकतो. यासाठी या संघटनेचे चार सदस्य देशही प्रयत्न करत आहे. पण पाचवा सदस्य म्हणजे चीन यामध्ये अडथळे निर्माण करत आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी पाचही सदस्यांचे एकमत आवश्यक असल्याने भारताचे सदस्यत्व लांबणीवर पडत आहे.
 

Web Title: russian president vladimir putin support and said india should be a permanent member of unsc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.