देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या रशियन तरुणाला घडू शकतो एका वर्षाचा कारावास
By admin | Published: March 17, 2016 03:15 PM2016-03-17T15:15:47+5:302016-03-17T15:15:47+5:30
सोशल मीडियामध्ये टिप्पणी करताना देवाचं अस्तित्व नाकारणं एका रशियन तरुणाला महाग पडण्याची शक्यता आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 17 - सोशल मीडियामध्ये टिप्पणी करताना देवाचं अस्तित्व नाकारणं एका रशियन तरुणाला महाग पडण्याची शक्यता आहे. व्हिक्टर क्रासनोव या 38 वर्षांच्या तरूणांनी दोन अनोळखी व्यक्तिंशी सोशल मीडियावर चर्चा करताना ईश्वर अस्तित्वात नसल्याचं मत मांडलं होतं. त्याच्याविरोधात धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली आणि त्याला आरोपी बनून कोर्टामध्ये हजर रहावं लागलं. जर त्याच्यावर हा आरोप सिद्ध झाला तर त्याला एका वर्षाचा कारावास होऊ शकतो.
ऑक्टोबर 2014 मध्ये व्हिक्टरचा दोघा अनोळखी व्यक्तिंशी काँटॅक्ट या रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवाद झाला होता. अन्य व्यक्तिंनी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन परंपरांचा उल्लेख केला तर व्हिक्टरने देवाचं अस्तित्व नाकारलं. विशेष म्हणजे त्याने ज्यूंचा अपमान करणारी भाषाही वापरली, परंतु ज्याबद्दल त्याला आरोपी करण्यात आलेलं नाही.
त्याच्याविरुद्ध 2015च्या सुरुवातीला तक्रार करण्यात आली, ज्यानंतर व्हिक्टरची एक महिना मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. आता व्हिक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अर्थात, व्हिक्टरच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा प्रतिवाद त्याच्या बाजुने करण्यात येत आहे. रशियन न्यायव्यवस्था व्हिक्टरला तुरुंगवासाची शिक्षा देते की त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेते हा रशियामधला चर्चेचा विषय झाला आहे.