रशियाचा गॅस पाईपलाईन प्रकल्प बासनात
By admin | Published: December 3, 2014 01:17 AM2014-12-03T01:17:48+5:302014-12-03T01:17:48+5:30
काळ्या समुद्रातून बल्गेरियाला व सर्बियामार्गे आॅस्ट्रियाला गॅस वाहून नेण्याचा रशियाचा प्रस्तावित साऊथ स्ट्रीम गॅस पाईपलाईन प्रकल्प आपण गुंडाळणार
मॉस्को : काळ्या समुद्रातून बल्गेरियाला व सर्बियामार्गे आॅस्ट्रियाला गॅस वाहून नेण्याचा रशियाचा प्रस्तावित साऊथ स्ट्रीम गॅस पाईपलाईन प्रकल्प आपण गुंडाळणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. या प्रकल्पामागे कधी आग्नेय युरोप भागात रशियाचा दबदबा निर्माण करण्याचा उद्देश होता. मात्र, रशिया व पाश्चात्त्य देशातील वाढत्या तणावामुळे या प्रकल्पाला बळी पडावे लागले.
पुतीन यांच्यासाठी हा दुर्मिळ राजनैतिक पराभव मानला जात आहे. ही पाईपलाईन आता तुर्कीला नेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
ही पाईपलाईन अस्तित्वात आणण्यातील अपयश हे युरोपसाठी नुकसानदायक असल्याचे सांगून पुतीन यांनी ब्रुसेल्सच्या दुराग्रहामुळे हे घडल्याचा आरोप केला.
पुतीन यांनी क्रिमियाचा घास घेत पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरी घडवून आणली असताना अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्याविरुद्ध फारसे काही केले नसल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर रशियाला त्याचा भव्य प्रकल्प गुंडाळावा लागल्याकडे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा आणि युरोपियन युनियनचा विजय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. रशियाने २००७ मध्ये व्यावसायिक हेतूने २२ अब्ज डॉलरचा हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. (वृत्तसंस्था)