शाहिद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:14 AM2017-07-30T03:14:21+5:302017-07-30T06:03:52+5:30
सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने पायउतार व्हावे लागलेल्या नवाज शरीफ यांच्यानंतर, पंतप्रधानपदाचे उत्तराधिकारी म्हणून सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम
इस्लामाबाद : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने पायउतार व्हावे लागलेल्या नवाज शरीफ यांच्यानंतर, पंतप्रधानपदाचे उत्तराधिकारी म्हणून सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीगने (नवाज) शनिवारी त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांची निवड केली. मात्र, पंतप्रधान होण्यासाठी शाहबाज यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर (मजलिस-ए-शूरा) निवडून येणे आवश्यक असल्याने, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुमारे दीड महिन्यासाठी शाहिद खाकन अब्बासी यांनी हंगामी पंतप्रधानपद सांभाळावे, असेही पक्षाने ठरविल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही. शरीफ यांना पद सोडावे लागले असले, तरी पक्ष त्यांच्या मुठीत असल्याने, तूर्तास अब्बासी व नंतर शाहबाज शरीफ ही व्यवस्था प्रत्यक्षात आणण्यास अडचण येईल, असे वाटत नाही.
संसदेचे सदस्य असलेले ५८ वर्षांचे अब्बासी शरीफ यांचे निष्ठावंत असून, नवाज यांनी राजीनामा देईपर्यंत ते मंत्रिमंडळात तेल आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री होते. शाहबाज यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा व आपल्या बंधुंच्या अपात्रतेने रिक्त लाहोरची जागा लढवायची, असे धोरण पक्षाने ठरविले असल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)