Pandora Papers Leak : पनामानंतर आता पँडोरा पेपर्स लीक; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 08:46 AM2021-10-04T08:46:23+5:302021-10-04T08:52:51+5:30
Pandora Papers Leak : ICIJ नं पँडोरा पेपर्स लीकद्वारे आर्थिक रहस्य आणि टॅक्स चोरीचं सत्य समोर आणलं आहे. यामध्ये ७०० पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे.
पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकाना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणं समोर आली होती. परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचा पर्दाफाश केल्यानंतर भारतातील बड्या व्यक्तींनी त्यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि उद्योजक अनिल अंबानी यांच्या नावाचाही समावेश आहे.
जगभरातील १.१९ कोटी दस्तऐवजांची माहिती शोधल्यानंतर ही आर्थिक रहस्य जगासमोर आणलं आहे. ICJI नं दिलेल्या माहितीनुसार पँडोरा पेपरच्या तपासात ११७ देशांतील ६०० रिपोर्टर्सचा समावेश होता. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अनिल अंबानी यांनी ब्रिटनच्या न्यायालयात स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं होतं, त्यांच्याकडेही परदेशात १८ कंपन्या असल्याचं म्हटलं आहे.
NEW: #PandoraPapers reveals the inner workings of a shadow economy that benefits the wealthy and well-connected at the expense of everyone else.
— ICIJ (@ICIJorg) October 3, 2021
Brought to you by ICIJ and 600+ journalists, the largest collaboration in journalism history. https://t.co/qXMuUcqPc4
सचिन तेंडुलकरचं नाव का आलं?
पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीच्या बहीणीनं त्याच्या पलायनाच्या एका महिन्यापूर्वी एक ट्रस्ट तयार केला होता. तसंच पनामा पेपर्स लीकनंतर अनेक भारतीयांनी आपली संपत्ती रिऑर्गनाईज करण्यास सुरूवात केल्याचं अहवालात नमूद केलं होतं. तसंच या अहवालानुसार दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंदेखील लीकच्या तीन महिन्यानंतर ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील आपली संपत्ती विकण्याचे प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार यामध्ये ३०० पेक्षा अधिक भारतीय नावांचा समावेश आहे. त्यापैकी ६० जणांविरोधात अनेक पुरावे जमा करण्यात आले असून तपासही करण्यात आला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये याबाबत गौप्यस्फोट केला जाणार आहे.
माजी कर आयुक्तांचाही समावेश
यापैकी अनेकांच्या विरोधात पहिल्यापासून तपास सुरू आहे, तर काहींवर कारवाईचा बडगाही उचलण्यात आला आहे. दरम्यान, या यादीत काही माजी खासदारांच्या नावाचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे कर चोरीशी निगडीत १४ सेवा प्रदातांच्या दस्तऐवजांमध्ये अशाही लोकांचं नाव आहे ज्यांचं काम हे थांबवणं होतं. यामध्ये माजी रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर, माजी कर आयुक्त आणि मादी सैन्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
आणखी कोणाची नावं?
यामध्ये केवळ भारतच नाही तर जगभरातील अनेक लोकांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये जॉर्डनचे राजा, युक्रेन, केनया, इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांचाही समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काही मंत्री आणि भारत, रशिया, अमेरिका, मेक्सिकोसह१३० अब्जाधिशांची नावंही यातून समोर आली आहे. याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्यांपासून त्यांच्या निकवर्तीयांची अशी ७०० जणांची नावंही यात आहे.